
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी दिलासा देणारी आणि भविष्य उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मा. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “आपुलकी” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत अशा कुटुंबातील पाल्यांना मोफत निवासी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमाची अंमलबजावणी पुणे येथील नामांकित सामाजिक संस्था स्नेहवन मार्फत केली जात असून, आळंदी येथे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज निवासी शाळा उपलब्ध आहे. या माध्यमातून इयत्ता 1 ली ते 5 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, निवास, भोजन व सर्वांगीण विकासाची संधी मिळणार आहे.
याबाबत यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी महत्त्वाचे आवाहन करताना सांगितले की, तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पात्र आणि गरजू मुलांची निवड करून त्यांची नावे दिनांक 10 मे 2026 पर्यंत तहसील कार्यालयाकडे सादर करावीत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. **पात्रतेच्या अटी **
संबंधित विद्यार्थी शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील असावा
प्रवेश इयत्ता 1 ली ते 5 वीपर्यंत
निवासी शिक्षणासाठी आळंदी येथे व्यवस्था
“आपुलकी” प्रकल्प हा केवळ शैक्षणिक मदत नसून, संकटग्रस्त कुटुंबातील मुलांना आधार देणारा आणि त्यांना नवसंजीवनी देणारा उपक्रम ठरत आहे. या माध्यमातून अनेक निराधार मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
त्यामुळे, यावल तालुक्यातील पात्र कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या पाल्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी 10 मेपूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







