
प्रशांत बाफना 8055440385
लोकशाही व्यवस्थेत “सत्यमेव जयते” हा केवळ घोषवाक्य नसून तो समाजाच्या नैतिकतेचा पाया आहे. या पायावर उभी असलेली पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते. पत्रकार हा केवळ बातमी देणारा व्यक्ती नसून तो समाजाचे डोळे, कान आणि विवेक असतो. त्यामुळे कोणतीही बातमी मांडताना पत्रकाराला आपले विचार, निरीक्षणे आणि सत्य मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो.
पत्रकारितेचे मुख्य ध्येय म्हणजे सत्याचा शोध आणि जनतेसमोर त्याचे निडरपणे सादरीकरण. एखादी बातमी योग्य आहे की अयोग्य, याचे मूल्यांकन करण्याचा अधिकार सर्वप्रथम त्या पत्रकाराकडेच असतो, कारण तो घटनास्थळी जाऊन, विविध बाजू समजून घेऊन ती मांडत असतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की पत्रकार कोणत्याही दबावाखाली येऊन किंवा भीतीपोटी आपले लेखन बदलावे.
आजच्या काळात काही ठिकाणी पत्रकारांवर इतर पत्रकारांकडूनच टीका, दबाव किंवा धमकी दिली जात असल्याच्या घटना समोर येतात. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. पत्रकारितेचा आत्मा हा स्वतंत्र विचारांमध्ये आहे. जर पत्रकारानेच दुसऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.
मतभेद असणे स्वाभाविक आहे. एखादी बातमी चुकीची वाटत असेल, तर त्यावर तथ्याधारित प्रतिवाद करणे, चर्चेतून सत्य बाहेर आणणे ही योग्य पद्धत आहे. पण धमकी, दडपशाही किंवा व्यक्तिगत आरोप करून आवाज दाबणे हे पत्रकारितेच्या मूल्यांना धरून नाही. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि लोकांचा माध्यमांवरील विश्वास कमी होतो.
पत्रकार हा कोणत्याही सत्तेचा किंवा दबावाचा गुलाम नसतो. तो फक्त सत्याचा आणि समाजाच्या हिताचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे प्रत्येक पत्रकाराने स्वतःच्या लेखनात प्रामाणिकपणा, निडरता आणि जबाबदारी जपणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर पत्रकारांच्या स्वातंत्र्याचाही आदर ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
आज गरज आहे ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांच्या संतुलनाची. पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, पण त्याचवेळी सत्य, नैतिकता आणि समाजहित यांचा आधारही तितकाच मजबूत असला पाहिजे. तेव्हाच “चौथा स्तंभ” खऱ्या अर्थाने सक्षम आणि विश्वासार्ह राहील







