
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी, दहिगाव, किनगावसह अनेक गावांमध्ये अवैधरित्या गावठी पन्नी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याने संपूर्ण तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावांत सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कारवाई करण्याऐवजी काही अधिकारी व कर्मचारी फक्त “हप्ते वसुली” करण्यात व्यस्त असल्याची चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत अवैध पन्नी दारूची विक्री खुलेआम सुरू असते. एवढेच नव्हे तर काही हॉटेल, टपऱ्या आणि गुप्त ठिकाणीही दारू विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
दरवर्षी निकृष्ट गावठी दारूमुळे मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाही प्रशासनाला जाग येत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. “अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले, लहान लेकरांचे भविष्य अंधारात गेले, तरीही अधिकारी डोळेझाक करत आहेत,” अशा तीव्र भावना महिलांनी व्यक्त केल्या.
काही संतप्त महिलांनी तर थेट सवाल उपस्थित केला आहे की,
“जर या अवैध दारूमुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या घरातील व्यक्तीचा जीव गेला असता किंवा त्यांच्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त झाले असते, तरीही ते असेच शांत बसले असते का?”
या प्रश्नामुळे तालुक्यातील वातावरण अधिकच तापले असून उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी आता जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ विशेष मोहीम राबवून अवैध पन्नी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. अन्यथा महिलांसह ग्रामस्थ रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.







