
जळगाव:
एकीकडे ‘डिजिटल इंडिया’च्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे जळगाव शहरातील अजिंठा हौसिंग सोसायटीत महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. काल मध्यरात्री १२ वाजेपासून या भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून, तब्बल १० तास उलटूनही अद्याप अंधार कायम आहे. “बिल वसुलीत वाघ आणि सेवेत मात्र शून्य” अशी महावितरणची अवस्था झाल्याने आता जनतेचा संयम सुटला असून, आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी नागरिकांनी दर्शविली आहे.
तक्रारींची दखल घ्यायला वेळ नाही का?
रात्री १२ वाजता वीज गेल्यानंतर हवालदिल झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे ३ ते ४ वेळा तक्रारी नोंदवल्या. मात्र, ‘तांत्रिक बिघाड’ असल्याचे पालुपद लावून नागरिकांच्या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. रात्रीचा अंधार, कडाक्याची उष्णता आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे बालके, वृद्ध आणि रुग्ण अक्षरशः कासावीस झाले आहेत. १० तास उलटूनही जर एक तांत्रिक बिघाड दुरुस्त होत नसेल, तर महावितरणचे कर्मचारी नेमके काय करत आहेत? असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत.
वसुलीसाठी ‘धडक’, मग सेवेसाठी ‘थडक’ का नाही?
महावितरणचा दुटप्पीपणा आता चव्हाट्यावर आला आहे. एखादे वीज बिल भरण्यास दोन दिवस उशीर झाला, तर लगेच वीज कापण्यासाठी पथके धाडणाऱ्या महावितरणला १० तास वीज नसताना तांत्रिक दोष शोधण्याचे सौजन्य दाखवता आले नाही. नियमित वीज बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना अशा प्रकारची वागणूक मिळत असेल, तर याला ‘अत्यावश्यक सेवा’ म्हणावे की ‘अत्याचारी सेवा’? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शासनाने आता तरी डोळे उघडावेत!
केवळ स्मार्ट मीटर आणि पायाभूत सुविधांच्या जाहिराती करून शासन आपली पाठ थोपटून घेत आहे. मात्र, जमिनीवरची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. जळगावच्या या भीषण समस्येने महावितरणच्या सडलेल्या कार्यप्रणालीचे दर्शन घडवले आहे. जर तातडीने वीजपुरवठा सुरळीत झाला नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर अजिंठा हौसिंग सोसायटीचे नागरिक महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेण्याच्या पवित्र्यात आहेत.
“आम्ही नियमित कर भरतो, वेळेवर वीज बिल भरतो, मग आम्हाला ही नरकयातना का? महावितरणने आता आपली कार्यपद्धती सुधारली नाही, तर जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.”
— संतप्त रहिवासी, अजिंठा हौसिंग सोसायटी







