
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
आमोदा (ता. फैजपूर) येथे दि. 16 ते 18 एप्रिल 2026 दरम्यान घडलेल्या घटनांमुळे दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात राजकीय दबावाखाली पक्षपाती कारवाई होत असल्याचा आरोप करीत, संपूर्ण घटनेची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समस्त बौद्ध समाज बांधवांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, दि. 16 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान एका महिलेस छेडछाड झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर संबंधित व्यक्तीस पोलिसांसमोर समज देण्यात आली होती.
त्यानंतर दि. 17 एप्रिल रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीने कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या महर्षी वाल्मीकी यांच्या मूर्तीची तोडफोड केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी 200 ते 250 जणांच्या जमावाने बौद्ध वस्तीवर हल्ला केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या हल्ल्यात काही नागरिकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला तसेच आंबेडकर नगर परिसरात वाहनांची तोडफोड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 16 प्रमुख आरोपी व 20 ते 25 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र, सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही तपासात आवश्यक गती व निष्पक्षता दिसत नसल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, या घटनेनंतर काही समाजकंटकांनी अफवा पसरवून मूर्तीची विटंबना तक्रारदारांनीच केल्याचा खोटा प्रचार केला. तसेच दि. 18 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात काही व्यक्तींनी प्रक्षोभक वक्तव्ये करून बौद्ध समाजातील युवकांची नावे जाहीर केल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात राजकीय दबावाखाली तक्रारदारांनाच आरोपी करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, निर्दोषांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, तसेच प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी शमिभा पाटील जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, गणेश सपकाळे भीम आर्मी जिल्हाध्यक्ष, अनोमदर्शी तायडे सर, बाळा पवार युवा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, बबलू नेतकर, सोनू नेतकर,बाळा सोनवणे, नरेंद्र मोरे,ईश्वर लहासे जिल्हा संघटक, रफिक बेग जिल्हा सचिव, भगवान मेघे यावल तालुका अध्यक्ष, श्रीकांत संन्यास तालुका सचिव इतर पदाधिकारी,राजेंद्र तायडे, दिलीप भालेराव, प्रदीप तायडे, राजू तायडे, रोहित तायडे, अजय तायडे, सागर तायडे, रामकृष्ण तायडे, मयूर केदारे, मनीष तायडे, नीलेश तायडे, अमोल तायडे, धर्मेंद्र तायडे, आकाश तायडे, किशोर तायडे यांच्यासह समस्त बौद्ध समाज बांधव, सामाजिक ,राजकीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.







