
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तब्बल तीन वर्षांपूर्वी सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत बांधून पूर्ण झाली असतानाही ती आजतागायत कुलूपबंद अवस्थेत पडून आहे. दुसरीकडे, जागेअभावी प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णांना ‘पी.एम. रूम’मध्ये उपचार देण्याची वेळ आली असून, ही बाब प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवणारी आहे.
किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग अत्यंत मर्यादित जागेत जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. एकाच खोलीत सर्व रुग्णांची तपासणी, उपचार आणि इतर प्रक्रिया पार पाडावी लागत असल्याने रुग्णांच्या गोपनीयतेचा व सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत कर्मचारी वर्गावर प्रचंड ताण येत असून, रुग्णसेवेची गुणवत्ता खालावत चालल्याचे चित्र आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, नवीन ग्रामीण रुग्णालयाची इमारत उपलब्ध असतानाही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्राथमिक आरोग्य केंद्र किनगावचे मालोद येथे स्थलांतर करण्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित असून, प्रशासन केवळ कागदोपत्री हालचाली करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, रुग्णांना अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत उपचार घ्यावे लागत आहेत. अपुरी जागा, अस्वच्छ वातावरण आणि आवश्यक सुविधांचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेली इमारत धूळ खात पडली असताना, दुसरीकडे रुग्णांना प्राथमिक सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत आहे, ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. “नवीन रुग्णालय सुरू करा किंवा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा,” असा इशाराच नागरिकांनी दिला आहे.
आता प्रश्न असा आहे की, जिल्हा आरोग्य अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे कधी लक्ष देणार? की अजून काही वर्षे किनगावकरांना अशाच हालअपेष्टा सहन कराव्या लागणार? प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे आरोग्य व्यवस्था धोक्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.






