
राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी
अहिल्यानगर/प्रशांत बाफना,: २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी दि. २३ एप्रिल रोजी मतदान तर ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ व ३३ (१) (ओ) नुसार मतदारसंघात कोणत्याही व्यक्तीस गैरकृत्य करण्यास दि. ४ मे २०२६ पर्यंत मनाई करणारे आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार मतदारसंघामध्ये कोणत्याही व्यक्तीस रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी गैरशिस्त वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोणत्याही मिरवणुका, रॅली, सभा ठरविलेल्या मार्गाव्यतिरिक्त नेण्यास तसेच दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त आणि वेळेव्यतिरिक्त इतर मार्गाने नेण्यास व वेळेचे उल्लंघन करण्यास मनाई आहे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी आणि प्रार्थनास्थळांच्या आसपास प्रार्थनेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावरील किंवा सार्वजनिक जागी लोकांनी एकत्र जमण्याच्या ठिकाणी गर्दी करण्यास किंवा अडथळा निर्माण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सर्व रस्त्यांवर, रस्त्यामध्ये, घाटात, घाटावर, सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्यामध्ये, जत्रा, देवालय, मशीद, दर्गा आणि सार्वजनिक लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागांमध्ये गोंधळ घालण्यास, बेशिस्तपणे वागण्यास मनाई आहे. कोणत्याही रस्त्यात, रस्त्याजवळ किंवा अनियमित व विनापरवाना सार्वजनिक जागी वाद्ये वाजवण्यास, गाणी म्हणण्यास, ढोल-ताशे वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ, कोणत्याही उपाहारगृहात ध्वनिक्षेपकाचा विनापरवाना वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
याबाबत कोणास सवलत अगर परवानगीची आवश्यकता असल्यास २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे
पोटनिवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर,:- राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच संपूर्ण मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह संबंधित पोलीस व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय राखत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी.
निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महसूल व निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवावे. संबंधित भागांत गस्त वाढवून नाकाबंदी प्रभावीपणे राबवावी आणि संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
मतदान पथके थेट मतदान केंद्रांवर पोहोचणार असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत मतदान यंत्रे केंद्रांवर पोहोचवली जाणार आहेत. या यंत्रांसोबत आवश्यक पोलीस बंदोबस्त देऊन ती विहित वेळेत मतदान केंद्रांवर पोहोचतील, यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या







