
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
जळगाव महसूल विभागाला हादरवून सोडणारी मोठी कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून, नशिराबाद भागातील मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांच्या सांगण्यावरून पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी इसमाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात मंडळ अधिकारी मिलिंद देवरे तसेच त्यांचा पंटर म्हणून काम करणारा सुरेंद्र प्रल्हाद अहिरे या दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरोधात स्थानिक नागरिकांनी त्यांच्या शेतामध्ये अवैधरित्या खोदकाम सुरू असल्याच्या तक्रारी महसूल विभागासह इतर शासकीय कार्यालयांकडे केल्या होत्या. या तक्रारींची चौकशी बंद करण्यासाठी मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांनी सुरुवातीला तब्बल एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीनंतर पन्नास हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचे समोर आले.
दरम्यान, तक्रारदाराने या संदर्भात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. एसीबीने केलेल्या पडताळणीत मंडळ अधिकारी देवरे यांनी लाचेची रक्कम खासगी इसम सुरेंद्र अहिरे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर एसीबीने पिंप्राळा तलाठी कार्यालयाबाहेर सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सुरेंद्र अहिरे हा पन्नास हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या थरारक कारवाईने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
ही कारवाई नाशिक एसीबीचे सापळा अधिकारी राहुलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास जळगाव एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत.
महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा ऐरणीवर
या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शासकीय कामांसाठी सर्वसामान्यांकडून लाच मागितली जात असल्याच्या तक्रारींना नव्याने हवा मिळाली आहे. एसीबीच्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.







