
अहिल्यानगर/प्रशांत बाफना
पाथर्डी : तालुक्यातील माळीबाभुळगाव येथील रहिवासी असलेल्या एका महिलेचा पाथर्डी शहरात भरदिवसा झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल बाळासाहेब वायकर (वय ३१, रा. माळीबाभुळगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, त्यांची सख्खी बहीण अर्चना बंडू पातकळ (वय २८, रा. पैठण एम.आय.डी.सी., ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) ही दिनांक ४ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पाथर्डी येथे आली होती. मुलांना शाळेला सुट्टी लागल्यामुळे ती आपल्या माहेरी येत होती.
पाथर्डी येथील नवीन बसस्थानकावर उतरून ती आपल्या भावाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभी असताना, अचानक राँग साईटने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार (क्र. MH 20 FG 5467) ने तिला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अर्चना पातकळ यांना छातीच्या डाव्या बाजूचे हाड फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातानंतर संबंधित चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जखमी महिलेला तत्काळ शतायू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे, अपघात करून पळून जाणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित वाहनाचा शोध सुरू केला असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शहरात वाढत चाललेल्या बेदरकार वाहनचालकांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः बसस्थानक परिसरात वाहतुकीचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
“अपघातानंतर मदत न करता पळून जाणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे






