
*शिवजयंतीनिमित्त वासुमित्रा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; रक्तदान शिबिरात ५२ दात्यांचा सहभाग*
जळगाव: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वासुमित्रा फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ५२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्री. वासुभाऊ सोनवणे आणि नगरसेवक श्री. गणेशभाऊ सोनवणे यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. वासुमित्रा फाउंडेशनचे अध्यक्ष भूषणभाऊ सोनवणे आणि उपाध्यक्ष जयेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. दुपारपर्यंत ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून शिवजयंतीसारख्या पवित्र दिवशी असा उपक्रम राबवणे हीच महाराजांना खरी मानवंदना आहे,” अशा भावना आयोजकांनी व्यक्त केल्या.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शशिकांत पाटील, श्रीकांत सोले, संदीप येवले, प्रशांत सोनवणे, उद्योजक सागरभाऊ पाटील, मनोज निंबाळकर, बबलू सपकाळे, योगेश सोनवणे, केतन सोनवणे, विनोद ढमाले, देवेंद्र मराठे, शुभम बोदडे, गितेश पवार, मारुती माळी, हेमंत रोकडे, योगेश निंबाळकर, निलेश निंबाळकर, गोलू सोनार, सचिन डोळे, मिलिंद सोनवणे, मयूर सोनवणे आणि पवन सोनवणे यांसह फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.






