
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध गावठी पन्नी दारू व्यवसायाविरोधात आता यावल पोलीस प्रशासन पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आले असून, साकळी परिसरातील अवैध दारू विक्री पूर्णतः बंद करण्यासाठी विशेष दारूबंदी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, गावात पोलिसांच्या कारवाईची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष पथक तयार करण्यात आले असून, तालुक्यातील अवैध दारू माफियांवर आता मोठ्या प्रमाणावर धडक कारवाया होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, आज दि. 18 रोजी हे विशेष दारूबंदी पथक साकळी येथे दाखल झाले असून, गावातील संशयित ठिकाणांची माहिती संकलित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
साकळी गावात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध गावठी पन्नी दारूमुळे महिलांमध्ये, पालकांमध्ये तसेच सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. गावातील अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात असल्याने सामाजिक वातावरण बिघडत असल्याच्या गंभीर तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. अनेक कुटुंबांमध्ये भांडणे, आर्थिक अडचणी व सामाजिक अस्थिरता वाढत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली होती.
याच पार्श्वभूमीवर साकळी येथील महिलांनी मोठा पुढाकार घेत अवैध दारू बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. शंभरपेक्षा अधिक महिलांच्या सह्यांसह दिलेल्या या निवेदनाची यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी गंभीर दखल घेतली. तसेच साकळी बिट पोलीस कर्मचाऱ्यांनीही या प्रकरणात तत्परता दाखवत वरिष्ठांना माहिती सादर केली. त्यानंतर तातडीने विशेष दारूबंदी पथकाची निर्मिती करण्यात आली.
विशेष बाब म्हणजे, या पथकामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांच्या तक्रारी, गुप्त माहिती व गावातील परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रशासनाला मोठी मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. या पथकाकडून आता गावातील संशयित अड्ड्यांवर अचानक छापेमारी, अवैध दारू निर्मिती केंद्रांवर कारवाई, पन्नी दारू साठा जप्ती तसेच संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
यावल पोलिसांनी उचललेल्या या कठोर पावलाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, “अवैध दारूमुक्त साकळी” करण्यासाठी प्रशासनाने सातत्याने अशीच धडक मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. महिलांनी दाखवलेल्या धाडसाचेही गावभर कौतुक होत असून, “महिलांच्या एकजुटीमुळेच आता गावातील अवैध धंद्यांवर लगाम बसणार” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाच्या या हालचालींमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून, अनेकांनी आपले अड्डे बंद करण्यास सुरुवात केल्याची चर्चा गाव परिसरात रंगू लागली आहे. आगामी काही दिवसांत यावल पोलीस प्रशासनाकडून मोठ्या धडक कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.







