
यावल तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावल येथे भ्रष्ट वनअधिकाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत वनरक्षक भैय्यासाहेब भिमराव गायकवाड (वय ४३) यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा दाखल केला आहे. गायकवाड हे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, यावल पूर्व येथे आगार रक्षक (वनरक्षक) म्हणून कार्यरत असून फॉरेस्ट क्वॉर्टर, यावल येथे वास्तव्यास आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे यावल तालुक्यातील अंजाळे, पाडळसे व परिसरात दोन बोलेरो पिकअप वाहनांद्वारे ट्रिपप्रमाणे लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतात. या लाकूड वाहतुकीवर कारवाई न करता ती सुरळीत चालू ठेवण्यासाठी आरोपी वनरक्षकाने दरमहा १०,००० रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने दि. २०/०३/२०२६ रोजी जळगाव ACB कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे ACB पथकाने तातडीने पडताळणी कारवाई केली असता पंचासमक्ष आरोपीने १०,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच तडजोडअंती ९,००० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचेही स्पष्ट झाले.
दरम्यान तक्रारदार लाच रक्कम देण्यासाठी गेले असता संशय आल्याने संबंधित लोकसेवकाने पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. मात्र ACB च्या पडताळणी कारवाईत लाच मागणी सिद्ध झाल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगझडतीत रोकड व महागडे मोबाईल सापडले
ACB च्या अंगझडतीत आरोपीकडून ९,०४० रुपये रोख तसेच दोन मोबाईल फोन सापडले.
- सॅमसंग अल्ट्रा २५ (अंदाजे किंमत १,१०,००० रुपये)
- आईटेल मोबाईल (अंदाजे किंमत १,००० रुपये)
मोबाईल हँडसेटची तपासणी करून आवश्यकता भासल्यास जप्त करण्याची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वनविभागात ‘हफ्तेखोरी’ सुरू असल्याचा संशय
या प्रकरणामुळे यावल तालुक्यात वनविभागातील भ्रष्टाचार आणि हफ्तेखोरीचा घाणेरडा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. दरमहा लाच मागण्याचा प्रकार म्हणजे प्रशासनात सुरू असलेल्या भ्रष्ट साखळीचा गंभीर पुरावा असून, यामागे आणखी कोणते अधिकारी सहभागी आहेत, याचीही चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
कारवाईचे नेतृत्व व पथक
या कारवाईचे पर्यवेक्षण योगेश ठाकूर (पोलीस उपअधीक्षक, ACB जळगाव) यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून श्रीमती रेश्मा अवतारे (पोलीस निरीक्षक, ACB नंदुरबार कॅम्प जळगाव) यांनी नेतृत्व केले.
पथकात
पोहेकॉ बाळू मराठे, पोका राकेश दुसाने, पोउपनिरी सुरेश पाटील आदींचा समावेश होता.
या प्रकरणाचा तपास हेमंत नागरे (पोलीस निरीक्षक, ACB जळगाव) करीत असून संपूर्ण कारवाईवर भारत तांगडे (पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र) तसेच माधव रेड्डी व सुनिल दोरगे (अपर पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र) यांचे मार्गदर्शन आहे.
जनतेत संताप, कठोर कारवाईची मागणी
वनविभागात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या लाचखोरीमुळे सामान्य नागरिक त्रस्त असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून नोकरीतून बडतर्फी, तसेच मालमत्ता चौकशी करण्याची मागणी जनतेतून होत आहे.






