
घरात बसून सत्ता येत नसते!
महाराष्ट्रात देवा भाऊ चा जलवा!
ठाकरे यांचे टांगा पलटी घोडे फरार!
प्रशांत बाफना 8055440385
तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचा असेल आणि सत्ता काबीज करायची असेल तर बारा महिने 18 काळ राजकारणच डोक्यात ठेवून काम करावं लागतं आणि लोकांच्या अडीअडचणीत धावून जावं लागतं. केवळ घरात बसून सत्ता मिळत नसते आणि वडापाव खाऊन कार्यकर्ते जगत नसतात हेच महापालिका निवडणुकांच्या निकालाने स्पष्ट केले आहे. राजकारण हे कमर्शीयल पद्धतीने खेळावं लागतं, भावनिक राजकारण जास्त दिवस टिकतं नाही. लोक विकासावर मतदान करतात भावनिक मुद्यावर नाही हे या निकालाने स्पष्ट केलं आहे.
एकीकडे राज्यातील 29 महापालिका निवडणूक प्रचारात प्रचार सभा रॅली आणि मुलाखती द्वारे थेट लोकांशी कनेक्ट होणारे देवेंद्र फडणवीस उर्फ देवा भाऊ मतदारांनी पाहिले तर दुसरीकडे मुंबईत सुद्धा प्रत्येक मतदारसंघात न फिरता पोपटपंची करणारे ठाकरे मतदारांनी पाहिले आणि त्यामुळेच राज्यातील 29 महापालिका निवडणुकात भाजप एक नंबरचा पक्ष राहिला आहे तर ठाकरे बंधू सहित शरद पवार अजित पवार आणि काँग्रेस पालापाचोळ्यासारखे उडून गेल्याचे चित्र दिसून आले आहे.नाही म्हणायला काँग्रेस ने चंद्रपूर, भिवंडी, लातूर, कोल्हापूर येथे चांगली लढत दिली.
लोकसभा असो की विधानसभा अथवा महापालिका किंवा नगरपालिका प्रत्येक निवडणूक ही पक्षासाठी आणि सत्तेसाठी महत्त्वाची असते या विचाराने प्रेरित होऊन लढणारा भारतीय जनता पक्ष एकीकडे आणि मी आणि माझा परिवार, माझं घर एवढाच विचार करणारे ठाकरे आणि विरोधी पक्ष दुसरीकडे अशी परिस्थिती राज्याच्या राजकारणात निर्माण झाल्याचे चित्र महापालिका निवडणूक निकालानंतर दिसून आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाचा आखाडा नोव्हेंबर महिन्यात जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. मात्र भाजप अथवा महायुतीच्या नेत्यांनी ज्या हिरीरीने प्रचार केला त्या उलट उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार अथवा काँग्रेस चे नेते फिरताना दिसले नाहीत. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. 131 पेक्षा अधिक नगर पालिका भाजपकडे आल्या.
त्यावेळी शिवसेनेचे खा तथा प्रवक्ते यांनी एका मुलाखतीत सांगितले कि, नगर पालिका निवडणूक ही स्थानिक कार्यकर्त्यांची असते त्यामुळे तिथं पक्षाने जोर लावण्याची गरज नसते, त्यांचे हे वाक्य ऐकल्यानंतरच महापालिका जाहीर झाल्यावर काय चित्र असेल हे लक्षात आले होते.याउलट भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी अगदी दहा हजार मतदारसंख्या असलेल्या नगर पालिकेत देखील प्रचार केला. ठाकरे बंधू किंवा उद्धव ठाकरे हे नगर पालिका निवडणुकीत कुठंच दिसले नाहीत, युवराज आदित्य सुद्धा फारसे फिरले नाहीत मग निकाल वेगळा काय लागणार.
अशाच पद्धतीने महापालिका निवडणुकीत सुद्धा चित्र दिसून आलं. एकीकडे सांगली, इचलकरंजी पासून ते थेट अकोला, अमरावती पर्यंत देवेंद्र फडणवीस हे पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत होते. दररोज तीन चार सभा, पत्रकार परिषद, टॉक शो घेऊन ते लोकांना भाजपचं विकासाचं व्हिजिन समजावून सांगत होते.या काळात त्यांनी 77 दौरे केले.दुसरीकडे ठाकरे बंधू मात्र सामनाच्या स्टुडिओ मध्ये बसून टोमणे मारणे, भाजप, मोदी, शहा, फडणवीस यांना शिव्यांची लाखोली वाहत होते.मुंबई असो कि महाराष्ट्र याला विकासासाठी काय आवश्यक आहे हे सांगण्याऐवजी ठाकरे बंधू मराठी अस्मिता, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव या मुद्यावर बोलत राहिले. दुसरीकडे फडणवीस यांनी मात्र कोस्टल रोड असो कि मेट्रो अथवा ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, संभाजीनगर या महानगरांच्या विकासावर मतदारांचे लक्ष केंद्रित केलं.
दोन्ही ठाकरे बंधू हे महाराष्ट्र सोडा पण मुंबई मधील गल्लीबोळात जरी फिरले असते तर आज थोडेफार चित्र वेगळे दिसले असते.निवडणूक जाहीर झाल्यानंतर आठवडा भराने ठाकरे छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक ला गेले, पुण्यात तर शेवटच्या दोन दिवसात पोहचले. एकीकडे देवेंद्र फडणवीस हे पहाटे पासून प्रचार दौऱ्यावर असताना राज ठाकरे दुपारी तीन नंतर बाहेर पडत होते. फडणवीस यांनी प्रचार काळात सर्वच वृत्तवाहिन्या, न्यूज पेपर यासंह सोशल मीडियावर मुलाखतीचा सपाटा लावला होता अन ठाकरे मात्र आपल्याच स्टुडिओ मध्ये बसून चर्चा करत होते.
निवडणूक म्हणजे योग्य नियोजन, कार्यकर्त्यांचे संघटन, लोकांशी थेट कनेक्ट, उमेदवार निवडताना त्याचे इलेक्ट्रोल मेरिट या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात ज्या भाजपने पाहिल्या अन केल्या. ठाकरे बंधूनी मात्र मुंबई वगळता फार कुठे लक्षच दिले नाही. त्यांचा जीव मुंबई मध्ये आहे हे अचूकपणे ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शिवसेने सोबत महायुती केली आणि इथंच गेम फिरला.
2019 साली सत्ता ताब्यात घेतल्यावर सुप्रिया सुळे यांनी अकेला देवेंद्र क्या क्या करेगा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना हिनवलं होतं, तसेच उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवलं होतं. या सगळ्या गोष्टी मनात ठेवत फडणवीस यांनी 2022 ते 2026 या काळात परफेक्ट प्लॅनींग केलं आणि मुंबई मधून ठाकरेंचा टांगा पलटी केला.







