
अहिल्यानगर । प्रशांत बाफना
कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी जेरबंद करत साडेपाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सायबाज नासिर पठाण (२३, चालक, रा. वाळकी) आणि मोहम्मद कैफ हाफिज कुरेशी (२५, खाटीक, रा. झेंडीगेट) अशी आहेत. गस्ती दरम्यान, कोतवाली पोलिस ठाण्याचे सफौ/ संभाजी दादाभाऊ कोतकर व पोसई/ कृष्णकुमार सेदवाड रात्री यांना मल्हार चौक, स्टेशन रोड भागात पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप (एम एच १६ ए वाय ६७१०) मधून जनावरांचा आवाज ऐकून पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला, परंतु चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून गाडी ताब्यात घेतली. तपासणी दरम्यान गाडीच्या मागील हौदामध्ये चारा-पाण्याची सोय नसताना गोवंशीय जनावर दाटीवाटीने भरलेले आढळले. पोलिसांना आरोपींच्या ताब्यातील ५ लाख रुपये किंमतीची बोलेरो आणि तीन गोवंशे जनावरे असा एकूण साडेपाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध ‘पशुसंरक्षण अधिनियम १९९५’ व ‘प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०’ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
भिंगारमध्ये दगडफेक; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
भिंगार परिसरात ८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या हाणामारी आणि दगडफेकीत चार जण जखमी झाले आहेत. या घटनेत काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी फिर्यादी गणेश विजय पंडित (२५, रा. घासगल्ली, भिंगार) यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्याच्या तक्रारीनुसार भूषण लांगोटे, रोहित लांगोटे, राजू दहीहंडे, सूरज दहीहंडे, संतोष नामदे, आदित्य भेंडे, किरण सपकाळ, सागर शिंदे, अज्जू परदेशी आणि मयूर तिजोरे या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमा करून फिर्यादीच्या घरासमोर दगडफेक केली. यामध्ये फिर्यादी गणेश पंडितसह साक्षीदार आकाश तांबे, विक्की गायकवाड आणि निलेश शिंदे हे जखमी झाले. तसेच मिनाक्षी भिंगारदिवे यांच्या घरातील टीव्ही फुटला आणि परिसरातील काही वाहनांचे नुकसान झाले. हा हल्ला जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे जमावबंदी आदेश लागू असतानाच करण्यात आला, त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम १४७, १४८, ३२४ तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तंबाखू वाहतूक करणारी कार पकडली
सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ७ लाख ३३ हजार ५०० रुपये रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ऋतिक आनंदा त्रिंबके ( रा. भुतकरवाडी, अहिल्यानगर)
याला ताब्यात घेतले आहेत. १० डिसेंबर २०२५ रोजी रात्री तारकपूर एस.टी. स्टँडजवळ असलेल्या थापर इन हॉटेल समोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला सुगंधी तंबाखूचे ७ पॅकेट आणि मावा तयार करण्यासाठी लागणारी २० किलो कच्ची सुपारी तसेच गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची हुंडाई कार जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एम.एन. गोटला करत आहेत







