
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
भारत सरकारच्या जनगणना अभियानांतर्गत स्वगणना (Self Enumeration) अभियानाला १ मे पासून अधिकृत सुरुवात झाली असून आता नागरिकांना घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे सहजपणे जनगणना करता येणार आहे. या अत्याधुनिक आणि सुलभ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जनगणना नोंदणी होणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना तहसीलदार नाझीरकर यांनी प्रत्यक्ष मोबाईलद्वारे स्वगणना प्रक्रिया करून दाखवत या उपक्रमाची सुलभता आणि महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या प्रात्यक्षिकामुळे उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या स्वगणना मोहिमेमुळे नागरिकांना सरकारी कर्मचाऱ्यांची वाट पाहण्याची गरज उरणार नाही. प्रत्येक व्यक्ती https://se.census.gov.in� या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः भरू शकते. त्यामुळे वेळेची बचत होणार असून अचूक माहिती संकलनालाही चालना मिळणार आहे.
तहसीलदार नाझीरकर यांनी विशेषतः यावल तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले की, “जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी वाटप आणि धोरणात्मक निर्णय याच माहितीवर आधारित असतात. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने स्वगणना करून सहकार्य करावे.”
सध्या डिजिटल भारताच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीत हा स्वगणना उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यावल तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.






