
अहिल्या नगर(प्रशांत बाफना)
वयोवृद्धापासून ते चिमुकल्यांपर्यंत सर्वांनाच मोबाइलचा लळा लागला आहे. मोबाइलचा अतिवापर होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तरुणाई मोठ्या प्रमाणात मोबाइलमध्ये अडकली आहे. तसेच लहान मुलेही मोठ्या प्रमाणात मोबाइलच्या आहारी जात असल्याने दृष्टी कमी होण्याचा धोका वाढत आहे. गेल्या काही वर्षात संवादाचे माध्यम असल्याने तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे.सध्या घरोघरी टीव्ही, मोबाइल,संगणक ,लॅपटॉप आदी वस्तू दैनंदिन कामकाजासाठी वापरतात, नवीन पिढी तर यात पुढे आहे. सुरुवातीला सहज दिलेला मुलांच्या हातातला मोबाइल तर आता सवईचा भाग झाला आहे. यामुळे डोळ्यांच्या अडचणी वाढत आहेत. नेत्र तज्ज्ञांकडे जाणारे बहुतांश नागरिक आपल्या मुलांची दृष्टी कमी झाल्यामुळे घेऊन जातात. लहान मुलांना रडू नये म्हणून मोबाईल हातात देऊन शांत करण्याचे प्रमाण वाढले आहे, मात्र यामुळे डोळ्यांचा धोका निर्माण होण्याची शंका आहे.काही मुले मोबाइलमध्ये गेम खेळताना दिसत आहेत. स्मार्ट फोनमध्ये नवनवीन बदल झाले असून अनेक गेम यामध्ये समाविष्ट झालेले आहेत.यातील तरुणांचा कर्दनकाळ ठरलेल्या अनेक गेमच्या विळख्यात अनेक मुले आणि नागरिक सापडले आहेत. मोबाईलवर लुडोसारख्या अनेक गेममध्ये ते गुंतून राहतात, त्यामुळे जवळ असूनसुद्धा जवळच्याला बोलायला वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे.शहरी भागात अगोदरपासूनच मुलांच्या हातात मोबाईल होता, मात्र कोरोना साथीत सगळीकडे ऑनलाइन शिक्षण चालू झाले, तेव्हापासून ग्रामीण भागातही मोबाइल मुलांच्या हातात जास्त प्रमाणात आले आहेत. त्यामुळे आता सतत मोबाइल मुलांना हातात ठेवावा वाटत असल्याचे चित्र आहे. मोबाईलमुळे लहान मुलांच्या दृष्टीवर दुष्पपरिणाम होऊन नजर कमी होते. त्यामुळे शक्यतो लहान मुलांना मोबाईल देऊ नये







