
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील हिंगोणा येथे आमदार निधीतून करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामावरून प्रश्न निर्माण झाला असून या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. रावेर-यावल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून तालुक्यात विविध विकासकामांना गती मिळाली आहे. हिंगोणा येथील हटकर कॉलनी तसेच गावांतर्गत डांबरीकरणाचे रस्ते हे त्याच विकासदृष्टीचा भाग म्हणून मंजूर करण्यात आले होते.
मात्र सदर रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हर्षल आंबेकर यांनी केला आहे. दिनांक 30 रोजी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, तसेच बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी आणि पंचायत समिती यावल येथील गटविकास अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी तक्रार सादर केली.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावल तालुक्यात भरघोस विकासकामे होत असताना हिंगोणा येथे झालेल्या डांबरीकरणाच्या कामात दर्जाबाबत गंभीर त्रुटी आढळून येत आहेत. संबंधित अभियंता रवींद्र इंगळे यांना वेळोवेळी कामाबाबत माहिती देण्यात आली, तसेच निकृष्ट कामाचे फोटो व व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आले. तरीदेखील त्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट दिलेली नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच पंधरा दिवस उलटूनही तक्रारीची दखल घेण्यात आलेली नसल्याने संबंधित अभियंता रवींद्र इंगळे यांची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांची गुणवत्ता अबाधित राहावी व नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेणे गरजेचे असल्याची भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.







