
अहिल्यानगर | प्रशांत बाफना
मध्य शहरातील गजबजलेल्या आशा टॉकीज चौक, कोतवाली पोलिस स्टेशन ते माणिक चौकापर्यंतच्या अतिक्रमणांवर बुधवारी महापालिकेने हातोडा टाकला. तर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा, एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. दुसर्या दिवशीही आयुक्त रस्त्यावर उतरले होते.
महापालिकेच्या पथकाने बुधवारी आशा टॉकीज चौकातील अतिक्रमणांवर कारवाई केली. यात १५० अतिक्रमणे हटविण्यात आली. गुरुवारी आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहिमेला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात झाली.
अतिक्रमित असलेल्या हातगाड्या, टपर्या मटक्याचे शेड हटविण्यात आले. यावेळी उप अभियंता सुरेश इथापे, अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाळ, क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे, क्षेत्रीय अधिकारी शेख रिजवान, अतिक्रमण पथक उपस्थित होते. माळीवाडा व एसटी स्टॅड परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आल्याने परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. वाहतूक सुरळित झाली.







