
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
यावल:
सांगवी बु!! ता. यावल परिसरात सोमवारी दि. २७ ऑक्टोबर २०२५ ढगफुटी स्वरूपात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शिवारातील ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिके काढणीच्या अवस्थेत असताना अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारी जमिनीवर कोसळली असून सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कष्टाचे सर्व श्रम वाया गेले आहेत.
सांगवी बु!! गावातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, नुकसानग्रस्त क्षेत्रांचा तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच भविष्यात अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ग्रामीण भागात झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.







