
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
यावल : येथील तहसीलदार कार्यालयाकडून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग नागरिकांना दरमहा ₹2500 अनुदान सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील जे दिव्यांग नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी आपले UDID (दिव्यांग ओळखपत्र), आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात जमा करावी.
तसेच लाभार्थ्यांनी आपले UDID प्रमाणपत्र आधार कार्डशी लिंक करून घेणे आवश्यक असून ही प्रक्रिया जवळच्या ई-सेवा केंद्रावर करता येणार आहे.
सदर कागदपत्रे दि. 20 मार्च 2026 पर्यंत जमा करावीत, असे आवाहन तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात आले आहे. कागदपत्रे वेळेत सादर केल्यानंतर पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा ₹2500 अनुदान सुरू होणार, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.







