
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील किनगाव येथे शासनाने उभारलेले भव्य ग्रामीण रुग्णालय सध्या केवळ ‘शोपीस’ ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. तब्बल दोन ते तीन वर्षांपूर्वी या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असतानाही अद्याप प्रत्यक्ष आरोग्य सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली ही सुशोभित इमारत केवळ देखाव्यासाठीच आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने किनगाव येथे शासनाने भव्य ग्रामीण रुग्णालय उभारले. आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी इमारत उभी राहिली, मात्र डॉक्टर व आवश्यक कर्मचारी वर्गाची नियुक्ती अद्याप पूर्णपणे झालेली नाही. त्यामुळे इमारत तयार असूनही सेवा सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे — जिल्हा शल्यचिकित्सक किनगाव ग्रामीण रुग्णालयासाठी डॉक्टर व संपूर्ण कर्मचारी वर्ग केव्हा पाठवणार? असा संतप्त सवाल आता किनगाव परिसरातील नागरिक करत आहेत. शासनाने इमारत उभी केली, परंतु डॉक्टर व कर्मचारी नसल्याने रुग्णालय सुरू होत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालय सुरू न झाल्यामुळे किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रचंड ताण पडत आहे. अत्यंत मर्यादित जागेत आणि साधनसामग्रीत डॉक्टर व आरोग्य कर्मचारी नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. एका छोट्याशा खोलीत अनेक रुग्णांची तपासणी करून सेवा देणे हे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
जागेचा अभाव, वाढती रुग्णसंख्या आणि अपुरी सुविधा अशा परिस्थितीतही प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी नागरिकांची सेवा करत आहेत. ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात असूनही ते सुरू नसल्यामुळे नागरिकांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा कठीण परिस्थितीतही आरोग्य सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालय सुरू होणार असल्याची आश्वासने गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडून दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात सेवा सुरू होत नसल्याने “सुरू होईल, सुरू होईल” या आश्वासनांवरच वेळ जात असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
किनगाव व परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी उभारलेले हे ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्वरित डॉक्टर व संपूर्ण कर्मचारी वर्गाची नियुक्ती करून हे रुग्णालय सुरू करावे, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
आता प्रश्न एकच —
किनगावचे ग्रामीण रुग्णालय प्रत्यक्षात सुरू होणार तरी केव्हा?
या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी प्रशासन व लोकप्रतिनिधींवर आहे, असे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.







