
“गद्दारांना जागा दाखवा आणि ‘हिरा’ चमकवा” राष्ट्रीय अध्यक्षा करुणाताई मुंडे यांचे जळगावकरांना जाहीर आवाहन.
*जळगाव प्रतिनिधी*
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून विरोधकांनी कितीही दबाव आणला, तरी ‘स्वराज्य शक्ती सेना’ डगमगलेली नाही. पक्षाने दिलेल्या १२ उमेदवारांपैकी शेवटच्या क्षणी दोन उमेदवारांनी दबावाला बळी पडून माघार घेतली असली, तरी उरलेले १० निष्ठावंत वाघ निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उभे आहेत. या सर्व १० उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापिका आणि राष्ट्रीय अध्यक्षा सौ. करुणाताई धनंजय मुंडे यांनी केले आहे.
*दबावाला भीक नाही, संघर्षाला साथ*
स्वराज्य शक्ती सेनेने जळगाव महानगरपालिकेत अधिकृतपणे १२ उमेदवार दिले होते. मात्र, प्रस्थापित पक्षांनी या उमेदवारांवर प्रचंड दबावतंत्राचा वापर केला. या दबावामुळे शेवटच्या दोन दिवसांत दोन उमेदवारांनी इतर पक्षाला पाठिंबा दिला. मात्र, या फोडाफोडीच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर देत पक्षाचे १० उमेदवार आजही जनतेच्या हक्कासाठी मैदानात आहेत.
*करुणाताई मुंडे यांचे आवाहन:*
यावेळी बोलताना सौ. करुणाताई मुंडे म्हणाल्या की, “स्वराज्य शक्ती सेनेचा लढा हा अन्यायाविरुद्ध आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आहे. आमच्या उमेदवारांवर दबाव आणून काहींनी आमची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला, पण माझे १० शिलेदार आजही जनतेसोबत प्रामाणिक आहेत. जळगावच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचाराला गाडून टाकण्यासाठी मतदारांनी आता ठाम राहिले पाहिजे. जे दबावाला बळी पडले त्यांचा विचार करण्यापेक्षा जे तुमच्यासाठी लढायला उभे आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.
“जळगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि खऱ्या परिवर्तनासाठी स्वराज्य शक्ती सेनेच्या सर्व १० उमेदवारांच्या नावासमोरील ‘हिरा’ या चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा,” असे आवाहन करुणाताई मुंडे यांनी केले आहे.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात स्वराज्य शक्ती सेनेने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून, मतदार आता ‘हिरा’ चिन्हाला पसंती देतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.







