
विशेष प्रतिनिधी | जळगाव
जळगाव: सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात काल सोन्याचा नाही, तर चक्क ‘नोटां’चा धूर निघाला. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी शहरात जे घडले, ते पाहता जळगावकरांच्या मान शरमेने झुकल्या आहेत. महायुतीने आपले १२ उमेदवार बिनविरोध निवडून आणले, ही वरकरणी त्यांच्या राजकीय ताकदीची झलक वाटत असली, तरी पडद्यामागे जो ‘अर्थ’पूर्ण खेळ झाला, त्याने जळगावच्या राजकीय संस्कृतीचे आणि लोकशाहीचे अक्षरशः धिंडवडे काढले आहेत.
‘बिनविरोध’ की जळगावकरांवर बळजबरी?
जळगावच्या राजकारणात शह-काटशहाचे राजकारण नवीन नाही, पण कालच्या माघारी सत्रात नीतिमत्तेचा जो चक्काचूर झाला, तो भयंकर होता. महायुतीच्या १२ जागा बिनविरोध करण्यासाठी जळगावात पैशांचा अक्षरशः पाऊस पाडला गेला. समोरच्या उमेदवाराला लढण्याआधीच शरण आणण्यासाठी ज्या पद्धतीने ‘लक्ष्मीदर्शन’ घडवले गेले, ते पाहता ही महापालिकेची निवडणूक होती की जनावरांचा बाजार, हेच कळायला मार्ग उरला नाही. ज्या ठिकाणी उमेदवार पैशाने झुकले नाहीत, तिथे ‘दंड’ आणि ‘भेदा’चे अस्त्र वापरून दबावतंत्राचा कळस गाठला गेला.
*लोकशाहीच्या चिंधड्या*
‘साम-दाम-दंड-भेद’ वापरून जागा खिशात घालणे याला चाणक्यनीती म्हणत नाहीत, तर त्याला ‘लिलाव’ म्हणतात. काल जळगाव महापालिकेच्या ज्या १२ जागा बिनविरोध झाल्या, तिथे प्रतिस्पर्धी उमेदवारांना माघार घेण्यासाठी ज्या ऑफर दिल्या गेल्याच्या चर्चा खान्देशात रंगल्या आहेत, त्या थक्क करणाऱ्या आहेत. यामुळे त्या विशिष्ट प्रभागातील जळगावकर मतदारांचा मतदानाचा हक्कच हिरावून घेतला गेला आहे. नागरिकांनी कोणाला निवडून द्यायचे, हे ठरवण्याआधीच ‘बंद दाराआड’ झालेल्या तडजोडींनी त्यांचे भविष्य ठरवून टाकले.
*पैशांचा महापूर आणि विकासाचा दुष्काळ*
जळगाव शहर आधीच मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. रस्ते, गटारी आणि पाणीपुरवठ्याचे प्रश्न आ वासून उभे आहेत. अशा परिस्थितीत जर उमेदवार कोट्यवधी रुपये ओतून बिनविरोध निवडून येत असतील, तर सत्तेत आल्यावर ते शहराचा विकास करतील की आपला ‘गुंतवणूक’ झालेला पैसा व्याजासहित वसूल करतील? हा प्रश्न आता प्रत्येक सुज्ञ जळगावकराला सतावत आहे.
कालच्या दिवशी केवळ १२ उमेदवार बिनविरोध झाले नाहीत, तर त्या १२ प्रभागांतील लोकशाही प्रक्रियेचाही अंत झाला आहे. सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर विरोधकांना नामोहरम करण्याचे हे लोण जळगावच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे.







