
२००२-२००३ च्या बॅचचा पुढाकार; शाळेला दिली ‘प्रोजेक्टर’ची भेट
कानळदा (ता. जि. जळगाव):
येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल २३ वर्षांपूर्वी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन आणि शिक्षक सन्मान सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. २००२-२००३ च्या बॅचने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जुन्या मित्र-मैत्रिणींनी एकत्र येत शाळेतील आठवणींना पुन्हा उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. एन. पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाजन मॅडम आणि कार्यक्रमाचे मार्गदर्शक अनिल चौधरी सर उपस्थित होते.
जुन्या आठवणी आणि भावूक क्षण
माजी विद्यार्थी हेमंत चौधरी, अविनाश खिवराडे, मिताली ठाकूर, मनिषा शिंदे, तुकाराम सपकाळे आणि संगिता जाधव यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील जुन्या दिवसांच्या आठवणी जागवल्या.
कार्यक्रमादरम्यान एक अत्यंत भावूक क्षण निर्माण झाला, जेव्हा शाळेतील विद्यार्थी मानव दिलीप मोरे याने आपल्या दिवंगत आई-वडिलांच्या स्मृतीप्रीत्यार्थ एक गाणे सादर केले. त्याचे गाणे ऐकून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.
शिक्षकांचे मार्गदर्शन व सन्मान
याप्रसंगी प्राचार्य आर. एन. पाटील, गणेश चव्हाण, महाजन मॅडम, बडगुजर मॅडम, मिस्त्री सर, अनिल चौधरी आणि कुमावत सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा यथोचित सन्मान केला.
शाळेला आधुनिक भेट
केवळ स्नेहसंमेलन न करता शाळेच्या प्रगतीत हातभार लावण्यासाठी, सन २००२-२००३ च्या बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून शाळेला एक ‘प्रोजेक्टर’ भेट दिला.
कार्यक्रमाचे नियोजन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्ज्वला राणे यांनी केले. सूत्रसंचालन चारुलता पांडुरंग तायडे व शिरीष पाटील यांनी केले, तर चारुलता येवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन अविनाश बिऱ्हाडे, प्रदिप सोनवणे, सुजाता भोळे, कल्पना सोनवणे, यांनी केले होते.







