
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8ब मध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. दि. 20 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात एकूण 3434 मतदारांपैकी 2667 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे या प्रभागात 77.66 टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.
सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग लागलेली दिसून आली. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरातील मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभाग नोंदवला. शांततेत, कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
मतदान प्रक्रियेचे यावल तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोहनमाला नाझिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजन करण्यात आले होते. नेमून दिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली.
दरम्यान, यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या नेतृत्वाखाली यावल पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राखली. त्यामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रभाग क्रमांक 8ब मधील उच्च मतदान टक्केवारीमुळे निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून, मतदारांनी दिलेला कौल नेमका कोणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रभाग 8ब मधील मतदारांनी दिलेला हा सहभाग नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.







