
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
साकळी येथील श्रद्धास्थान हजरत कुतुब सजन शाह वली (रहेमतुल्ला अलै) यांच्या उर्समधील दिनांक 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या संदल सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या पवित्र धार्मिक कार्यक्रमासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यावल पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी मध्ये विशेष पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. या बंदोबस्तामध्ये पोलिस हवालदार रोहिल गणेश, पोलिस अंमलदार अल्लाउद्दीन तडवी, दंगल नियंत्रण पथक, तसेच माजी पोलिस पाटील शिरसाड चंद्रकांत इंगळे आणि पोलिस मित्र नाना भालेराव यांचा सक्रिय सहभाग आहे.
संदल मिरवणूक, दर्गा परिसर, प्रमुख रस्ते व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचे चक्री गस्त पथक, वाहतूक नियंत्रण, तसेच सतर्क नजर ठेवण्यात येत आहे. भाविकांना शांततेत दर्शन व इबादत करता यावी, तसेच साकळीतील हिंदू–मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेला हा सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन पूर्ण दक्षतेने काम करत आहे.
पोलिस प्रशासनाने नागरिक व भाविकांना सहकार्याचे आवाहन केले असून, कोणतीही अफवा पसरवू नये, शिस्त पाळावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा संदेश देणारा हा उर्स सोहळा सुरक्षित व शांततेच्या वातावरणात पार पडेल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.







