
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
नाशिक येथील तपोवन परिसरात आगामी कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. सदरचा प्रस्ताव हा निसर्ग व सौंदर्य यांची हत्या करणारा आहे. सदरचा प्रस्ताव तात्काळ थांबविण्यात यावा या मागणीचे निवेदन पाचोरा तालुका व शहरातील पत्रकार बांधवांतर्फे उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांना देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी पत्रकार विनायक दिवटे, लक्ष्मण सुर्यवंशी, दिलीप जैन, बंडु सोनार, चिंतामण पाटील, नंदकुमार शेलकर, राहुल महाजन, भुवनेश दुसाने, नरसिंग भुरे, प्रविण बोरसे, दिलीप परदेशी, जाविद शेख, छोटु सोनवणे, निलेश पाटील प्रमोद सर बोला भाऊ पाटील यांचेसह पाचोरा तालुका व शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.तपोवन हा ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक तसेच पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील व पवित्र परिसर आहे. ऋषी-मुनींनी याच परिसरातील विशाल वृक्षांच्या सान्निध्यात तपश्चर्या करून या भूमीचे आध्यात्मिक महत्त्व वाढवले आहे. अशा इतिहासप्रसिद्ध व पवित्र वृक्षसंपदेवर कुऱ्हाड चालवून तेथे सिमेंटच्या इमारती बांधण्याचा प्रस्ताव किती योग्य आहे, याबद्दल आम्हाला तीव्र आणि ठाम आक्षेप आहे. आत्तापर्यंत वर्षानुवर्षे कुंभमेळ्यांचे आयोजन याच तपोवन परिसरात होत आले आहे. त्या प्रत्येक मेळ्यात लाखो साधू-संत, भक्तगण व सर्वसामान्य भाविकांनी तपोवनातील नैसर्गिक वृक्षसंपदेच्या छायेखाली विश्रांती घेतली आहे. सिमेंटच्या जंगलात, वातानुकूलित घरांत राहणाऱ्या लाखो भाविकांनी सुद्धा या वृक्षछायेत मोकळा, स्वच्छ श्वास घेतला आहे. अशा परिस्थितीत आज अचानकच या पवित्र वृक्षसंपदेची तोड करण्याची गरज का भासू लागली, हा अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तसेच, या वृक्षतोडीच्या माध्यमातून तपोवनातील जमीन धनदांडग्यांच्या हवाली करून तेथे भाविकांच्या श्रद्धेचा व पर्यटनाच्या नावाखाली जनतेचा आर्थिक शोषण करणाऱ्या महाकाय सिमेंटच्या इमारती उभ्या करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी गंभीर शंका लोकांमध्ये निर्माण झाली आहे. पवित्र परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणाचा समतोल यांचा बळी देऊन पुन्हा एकदा सिमेंटच्या जंगलाची निर्मिती करण्याचा घाट रचला जात आहे, अशी भावना समाजात प्रबळ होत आहे. एकीकडे शासन वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पर्यावरण संवर्धनाचे गोडवे गात असताना, दुसरीकडे तपोवनासारख्या वारसास्थळीच हजारो झाडांची कत्तल करणे ही अत्यंत विरोधाभासी व पर्यावरणविरोधी कृती आहे. याबाबत पाचोरा पत्रकार संघ तसेच विविध पत्रकार संघटनांनी एकत्रितपणे तीव्र निषेध व्यक्त केला आहे. जर प्रस्तावित वृक्षतोड तात्काळ स्थगित करण्यात यावी. नाशिक तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड तात्काळ स्थगित करण्यात यावी, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल चौकशी करण्यात यावी, तपोवनाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व अबाधित राहील याची शासनाकडून खात्री द्यावी. अशा आषयाचे निवेदन पाचोरा तालुका व शहर पत्रकार बांधवांतर्फे उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांना देण्यात आले आहे.







