
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
नेवासा नगरपंचायतीच्या पुनर्लागू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात आज (10 डिसेंबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असताना, संपूर्ण निवडणूक परिस्थिती जैसे थे राहिली. एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने येथील निवडणुकीचं रणकंदन पूर्वीच्या ठिकाणावरूनच पुढे सरकलं आहे.
निवडणूक आयोगाच्या अचानक आलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय पक्षाच्या ‘बी’ सर्टिफिकेटसोबत दाखल झालेल्या काही उमेदवारांना पाच सूचक नसल्याचे कारण दाखवून अपात्र करण्यात आले होते. या अप्रत्याशित निर्णयाविरोधात नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे उमेदवार शंकरराव लोखंडे यांच्यासह पाच प्रभागातील उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयानेही त्यांचे अर्ज अपात्र ठरवले.
निकाल 24 आणि 25 तारखेला जाहीर झाल्याने उमेदवारांना नियमाप्रमाणे मिळणारी तीन दिवसांची मुदत उपलब्ध झाली नाही. त्यामुळे नेवासा नगरपंचायतीची निवडणूक तांत्रिकदृष्ट्या पुढे ढकलावी लागली. राज्यातील अनेक नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुका याच कारणावरून पुढे सरकल्या होत्या.
नेवासा निवडणुकीतही निर्णय अधिकारी आणि न्यायालय – दोन्ही स्तरांवर अर्ज फेटाळले गेल्याने तात्पर्याने निवडणुकीच्या मैदानात फारसा फरक पडणार नव्हताच. परंतु आयोगाच्या नवीन आदेशानुसार 2 तारखेला होणारी निवडणूक आता 20 डिसेंबरला होणार आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 4 तारखेला सुधारीत कार्यक्रम जाहीर केला होता.
त्या सुधारित कार्यक्रमानुसार आज (दि. १०) अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. मात्र एकाही उमेदवाराने मागे न हटल्यामुळे निवडणूक शाबूत राहिली असून, ब्रेक लागलेली प्रचारयंत्रणा आजपासून पुन्हा जोरात सुरू होणार आहे. गेल्या आठ दिवसांत उमेदवारांनी भरपूर तयारी करून ठेवली असून आता प्रभागनिहाय उमेदवारांची संख्यादेखील तीच आहे. एकंदरीत, या निवडणुकीच्या माध्यमातून नेवासा शहरात प्रचाराचा धुराळा पुन्हा एकदा नव्या जोमाने उडणार आहे.







