
प्रतिनिधी पुणे स्नेहा उत्तम मडावी
केंद्रशाळा, मजरेवाडी शाळेच्या शिक्षिका व कवयित्री नयना गुरव, इचलकरंजी. यांचा अभिनव उपक्रम वडिलांच्या पंच्याहत्तरीला पंच्याहत्तर कवितांचा ऋण हा काव्यसंग्रह प्रकाशित करून एक वेगळाच संदेश समाजाला दिला आहे. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी इस्लामपूर येथील देव मल्टीपर्पज हाॅल मध्ये जेष्ठ लेखिका निलम मानगावे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, गजानन गुरव. मुख्य प्रशासकीय अधिकारी, जीवन प्राधिकरण. मुंबई,निवासराव गुरव, निशादेवी गुरव, बी एस पाटील, अरूणराव गुरव यांच्या शुभहस्ते कवयित्री नयना गुरव यांनी लिहीलेल्या ऋण या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी डाॅ. एस एच. भोसले, हर्षवर्धन भिंताडे, गोवर्धन गुरव, कु अंकिता गुरव, चिं. अथर्व गुरव, नातेवाईक, हितचिंतक आणि मित्र परिवार मोठ्या संख्यने उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर निवासराव गुरव यांचा त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्त भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली संदिपक यांनी केले होते. आईच्या मायेवर जितकं जग लिहितं, तितकंच बापाचं ऋण शब्दांत उतरवणं कठीण असतं. पण लेखिका नयना गुरव यांनी ते शक्य करून दाखवलं आहे. त्यांच्या ‘ऋण’ या भावकाव्यसंग्रहाचं प्रकाशन हे केवळ एक साहित्यिक क्षण नाही, तर एका मुलीच्या मनातील ओलसर कृतज्ञतेचं साक्षीदार ठरणारं अविस्मरणीय पर्व आहे. आपल्या वडिलांच्या पंच्याहत्तरीच्या औचित्याने, नयना गुरव यांनी नेमक्या पंच्याहत्तर कवितांद्वारे बापाच्या जीवनातील प्रत्येक टप्प्याला शब्दांची ओंजळ अर्पण केलेली आहे. बालपणीचा आधार, तरुणपणीचा संघर्ष, कुटुंबासाठीचे त्याग, आणि शेवटपर्यंत टिकून राहिलेली निःशब्द प्रेमाची सावली. प्रत्येक कवितेत एक नात्याचं ऋण आहे. कधी मातीसारखं सहनशील, कधी आभाळासारखं विशाल, तर कधी सागरासारखं गूढ. “ऋण” हे केवळ कवितांचं पुस्तक नसून, ते एका मुलीच्या अंतर्मनाचं भावस्मारक आहे. या प्रकाशन सोहळ्यात वडिलांच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि नयना गुरव यांच्या शब्दांतील भावगंध हे दोन्ही एकत्र झरतील. काव्यसंग्रह प्रकाशनाचा उपक्रम म्हणजे “साहित्य” आणि “संस्कार” यांच्या संगमात उमललेलं एक स्मरणपुष्प आहे.







