
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
साकळी बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोडवरील मेश ऍग्रो कंपनीचे संचालक युनूस मन्सूरी व रफिक मन्सूरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहात व सामाजिक सलोख्याच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमातून हिंदू-मुस्लिम एकात्मतेचा प्रेरणादायी संदेश समाजासमोर मांडण्यात आला.
या प्रसंगी यावल परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, तसेच साकळी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन योगेश खेवलकर यांनी केले.
कार्यक्रमात बोलताना साकळी येथील प्रगतशील शेतकरी जितेंद्र वसंतराव महाजन यांनी भावनिक शब्दांत मेश ऍग्रोच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, मन्सूरी बंधूंचे वडील स्व. शेफी मन्सूरी यांनी आपल्या हयातीत साकळी गावात सर्व समाजाला एकत्र आणत, धर्मभेद विसरून एकोप्याची भावना रुजवली होती.
“आज त्याच एकात्मतेचा वारसा युनूस मन्सूरी आणि रफिक मन्सूरी पुढे नेत आहेत. ते केवळ उद्योगपती नाहीत, तर समाजासाठी सदैव मदतीचा हात देणारे व सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व आहेत,” असे महाजन यांनी नमूद केले.
या सोहळ्यामुळे साकळी गावात हिंदू-मुस्लिम ऐक्य अधिक दृढ होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्याची भावना जपणाऱ्या मेश ऍग्रो संचालकांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
एकूणच, हा ईद मिलाद सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता, समाजातील एकात्मता, बंधुभाव आणि सौहार्दाचा प्रेरणादायी उत्सव ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेश ऍग्रो येथील सर्व कामगारांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी मेश ऍग्रो संचालक युनूस मन्सूरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.







