
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
जळगाव — जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून कथित औषध खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आज चौकशीसाठी मुंबई येथे बोलावण्यात आल्याची गुप्त माहिती दैनिक हॅलो बातमीदार ला मिळाली आहे. या घडामोडीमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औषध खरेदी प्रक्रियेत अनियमितता, नियमबाह्य मंजुरी आणि पुरवठादारांना लाभ मिळाल्याच्या गंभीर आरोपांची प्राथमिक स्तरावर नोंद झाली असून याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ स्तरावरून चौकशीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संबंधित प्रकरणात आर्थिक व्यवहार, निविदा प्रक्रिया आणि औषध पुरवठ्याचे बिल यांची सखोल तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही औषधांची गरज नसताना खरेदी, बाजारभावापेक्षा जास्त दराने बिल मंजूर करणे आणि कागदोपत्री पुरवठा दाखवल्याचे आरोप देखील पुढे आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केवळ विभागीय स्तरावर न राहता राज्य स्तरावर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, आज मुंबई येथे अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावण्यात आल्याची माहिती समोर येताच आरोग्य विभागात प्रचंड खळबळ उडाली असून संबंधित कागदपत्रांची हालचाल सुरू झाल्याचे सांगितले जाते. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. “औषधांसारख्या संवेदनशील विषयात गैरव्यवहार झाला असेल तर तो गंभीर गुन्हा असून जबाबदारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून या संदर्भात अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे उद्या मुंबईतील चौकशीनंतर नेमकं काय उघड होतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







