
माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बालमटाकळीत निषेध….!
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
राजकारण आणि समाजकारण करत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला कधी आम्ही थारा दिला नाही, कधी त्यांची संगत केली नाही, त्यामुळे म्हातारी मेल्याचे दुःख नाही परंतु आज काळ सोकत चालला असल्याने बालमटाकळी येथील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा बसणे गरजेचे आहे, आज माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यावर जी वेळ आली आहे ती वेळ कोणावरही येऊ शकते, त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना वेळीच आळा बसणे आणि त्यांचा योग्य तो बंदोबस्त करणे ही गावासाठी आणि समाजासाठी काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव देशमुख यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यावर बोधेगाव येथील साईधाम जवळील राज हॉटेल समोर काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी गुरुवार दि. २९ रोजी भ्याड हल्ला केला असून या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवार दि. १ रोजी सर्व व्यापाऱ्यांनी गाव कडकडीत बंद करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित निषेध सभेत माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव देशमुख हे बोलत होते. तसेच हा भ्याड हल्ला करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना पोलिसांनी तात्काळ अटक न केल्यास लवकरच बालमटाकळी ठिकाणी तीव्र असा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉ. राम बामदळे, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव देशमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते कासमभाई शेख, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष कमुभाई शेख, सेवा संस्थेचे संचालक रतनराव देशमुख, कुस्ती संघाचे तालुकाध्यक्ष पैलवान विक्रमराव बारवकर, माजी सरपंच भानुदास गलधर, चंद्रकांत गरड, सेवा संस्थेचे माजी चेअरमन हरिश्चंद्र घाडगे, सुदामराव शिंदे, माणिकराव शिंदे, अशोकराव वाघुंबरे, सेवा संस्थेचे संचालक रोहिदास भोगले, सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटेकर, रायभन शिंदे, युसूफभाई शेख, बाळासाहेब दोडके, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देशमुख, मगबूल शेख, बाबासाहेब वाघुंबरे, कल्याण शेळके, बाळासाहेब उबाळे, परशुराम घोरपडे, बाबासाहेब देशमुख, गजानन देशमुख, अशोक वैद्य, संभाजी घोरपडे, प्रवीण देशमुख, भागचंद काळे, सचिन शिंदे, रशीद शेख यांच्यासह गावातील ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी चौकट :-
खंडणी किंवा टोळयांची दहशत यांसारखे गुन्हे पूर्वी मोठ्या शहरांमध्ये होत असत परंतु आता पोलीस प्रशासनाच्या निष्काळीपणामुळे त्याचे लोन आता बालमटाकळी सारख्या छोट्या गावापर्यंत पोहोचले आहे. हे जर मोडून काढायचे असेल तर सज्जन म्हणवून घेणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन यांना धडा शिकविण्याची आज आवश्यकता आहे. कारण गेल्या शंभर वर्षाची या गावाला अखंड हरिनाम सप्ताहाची धार्मिक आणि सामाजिक परंपरा असून या गावात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या गुण्या गोविंदाने आणि एकोप्याने राहत आहे, परंतु अलीकडच्या काळात काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना गावातीलच काही लोकांनी पाठबळ दिल्याने त्यांचे धाडस आणि मनोबल दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि त्यातूनच अशा धाडसी घटना घडत आहे.मधुकर पाटेकर
गेल्या ६० ते ६२ वर्षाच्या कार्यकाळात मी गावच्या सुखदुःखात तसेच सामाजिक, धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर भूमिका ठेवून राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि समाजकार्याच्या ठिकाणी समाजकार्य केले आहे, गावातील होणारे वाद विवाद हे गावातच मिटवून गावचे जे संस्कार आपल्यावर आहेत ते आपण जपले आहे. कुणावरही कधी अन्याय होऊ दिला नाही. नेहमी समंजस्याची भूमिका ठेवून काम केले आहे. परंतु गेल्या वर्ष दोन वर्षात आपल्या गावात बाहेरून गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुलं येऊन त्यांनी आतापर्यंत गावात चार ते पाच मोठ्या दहशतीच्या घटना केल्या आहेत. आणि ही झालेली दहशत पाहून गावातीलच छोटी छोटी मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळताना दिसत आहे. आणि यामुळे गावचे वातावरण पूर्णपणे दूषित झाले आहे. त्यामुळे आमच्यावर जर अशी वेळ येत असेल तर या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा वेळीच बंदोबस्त करावा. रामनाथ राजपुरे
माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, शेवगाव







