
अहिल्यानगर/प्रशांत बाफना
सोनईचे माजी सरपंच दादासाहेब वैरागर आणि ग्रामपंचायत सदस्य सचिन पवार यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी…! हॉटेल व्यावसायिक अनिल शेटे पाटील यांनी दिलं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन…!नेवासे तालुक्यातल्या सोनईत वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी सोनई पोलीस ठाण्यासमोर दिनांक २९ ऑक्टोबर रोजी भर पावसात सोनई पोलीस ठाण्यासमोर मोर्चा नेला होता. त्या मोर्चात लक्ष्मण (लखन) जगदाळे, अनिल शेटे पाटील यांच्यासह अनेकांनी मनोगतं व्यक्त केली होती. मात्र याचा राग मनात धरुन सोनई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दादासाहेब शंकर वैरागर आणि ग्रामपंचायत सदस्य सचिन तुळशीराम पवार या दोघांनी दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास सोनई बसस्थानकाजवळ आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली, अशा आशयाचं निवेदन हॉटेल व्यावसायिक अनिल पोपटराव शेटे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे एसपी सोमनाथ घार्गे यांना दिलं.
या निवेदनात अनिल शेटे पाटील यांनी म्हटलं आहे, की मी एक हॉटेल व्यवसायिक असून गेल्या १० वर्षांपासून सोनई येथे हॉटेलचा व्यवसाय करत आहे. हॉटेल व्यवसायामुळे मला रात्री उशिरापर्यंत त्याठिकाणी थांबावं लागतं. मात्र वैरागर आणि पवार यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे माझ्या जिविताला या दोघांपासून धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या या धमकीकडे सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं. परंतू दिनांक ३ डिसेंबर रोजी लखन जगदाळे यांच्यावर माजी सरपंच दादासाहेब वैरागर यांच्या सांगण्यावरून चार ते पाच जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे या टोळीतले फरार गुन्हेगार माझ्यावर कधीही हल्ला करु शकतात. या संभाव्य हल्ल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी या गुन्हेगारी टोळीला तात्काळ अटक करावी.
या टोळीची सोनई आणि परिसरात निर्माण झालेली दहशत आणि त्यातून सोनई तसेच परिसरात वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी सोनईच्या ग्रामस्थ आणि व्यापाऱ्याने सोने पोलीस ठाण्यावर भर पावसात मोर्चा नेला होता. त्या मोर्चात गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध अनेकांनी भाषणं केली होती. मात्र माजी सरपंच दादासाहेब सचिन पवार यांनी मला अशी धमकी दिली, की ‘तु आमचे विरोधात बोलतो काय? तुझ्याकडे आणि तुझ्या भावाकडे पहावे लागेल. थांब थोडे दिवस तुमच्या दोघांचा काटा काढावा लागेल’. या टोळीने माझ्या घराजवळ आणि हॉटेलजवळ ‘रेकी’ केलेली आहे. त्यामुळे या टोळीतले गुन्हेगार माझ्यावर कधीही जीवघेणा हल्ला करु शकतात. ही टोळी माझ्यावर जीवघेणा हल्ला करणार आहे, असं मला त्रयस्थ लोकांकडून समजलं. त्यामुळे या टोळीविरुद्ध पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी विनंती अनिल शेटे पाटील यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.







