
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांवर नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा आदेश दिला असून, ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी स्थगित करून ती २१ डिसेंबर रोजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेत आरक्षणातील चुका, चिन्ह वाटपातील तक्रारी आणि प्रलंबित याचिकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय देण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रियेतील काही प्रभागांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याची तक्रार न्यायालयात दाखल झाली होती. तर काही ठिकाणी निवडणूक चिन्ह वाटपात नियमभंग झाल्याचे आरोप करत उमेदवारांनी याचिका केली होती. या सर्व प्रकरणांवर सुनावणी सुरू असताना, निकाल जाहीर झाल्यास कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
खंडपीठाने या तक्रारींची तपासणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी न घेण्याचे निर्देश दिले असून, राज्य निवडणूक आयोगाला सुधारित वेळापत्रकानुसार प्रक्रिया राबवण्यास सांगितले आहे. आयोगाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे स्पष्ट केले असून, मतमोजणीची नवी तारीख २१ डिसेंबर २०२५ निश्चित केली आहे.
या निर्णयाचा नागपूरसह राज्यातील अनेक नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निकालांवर थेट परिणाम झाला आहे. मतदान पूर्ववत झाले असले तरी, निकालासाठी आता उमेदवार व मतदारांना अतिरिक्त प्रतीक्षा करावी लागणार आहे. अश्या परिस्थितीत २१ डिसेंबर पर्यन्त आचारसंहिता लागू राहील व कोणतेही एक्झिट पोल देखिल देता येणार नाही.न्यायालयीन प्रकरणांवरील अंतिम सुनावणी आणि त्यानंतरचे आदेश आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.







