
जळगाव प्रतिनिधी – शहरातील मध्यवर्ती मानल्या जाणाऱ्या शाहू नगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य व स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने नागरिकांनी आज महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
हनुमान मंदिर ते नूरानी मस्जिद या परिसरातील नाल्यांची नियमित साफसफाई न केल्यामुळे गटारे वारंवार चोकअप होत आहेत. या गटारातील दूषित पाणी रस्त्यावर सांडत असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. लहान मुले, महिलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच दररोज आरोग्याच्या धोक्यातून जाण्या–येण्याची वेळ येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नाल्यांसोबतच रस्त्यावरील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने संपूर्ण परिसर अस्वच्छतेने पोखरला आहे. कर वेळेवर भरूनही मूलभूत सुविधा न मिळणे ही दुर्दैवी बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय भागात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढून अनेकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीमुळे परिसरात आजारराई पसरू शकण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. त्यामुळे गटार सफाई, कचरा व्यवस्थापन आणि भटकी कुत्री नियंत्रण यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शाहू नगर परिसरातील महमुद शेख, रईस शेख चांद, शेख मुस्ताक युसूफ, समीर चिरागी, तोसीक शेख इकबाल, साहिल भिस्ती, उमर रोख, आमिन खान आणि इमाम खान यांनी संयुक्तपणे हे निवेदन आयुक्तांकडे सादर केले.
नागरिकांच्या निवेदनामुळे प्रशासन आता कितपत हालचाल करते, याकडे संपूर्ण भागाचे लक्ष लागले आहे.







