
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून केलेल्या फसवणुकीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना शेवगाव पोलिसांनी शिताफीने पकडत जेरबंद केले. गुन्हा क्रमांक 887/2023, भादंवि कलम 420, 406, 409 तसेच एमपीआयडी कायदा कलम 3 व 4 अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर प्रकरणात मुख्य आरोपी साईनाथ कल्याण कवडे याला यापूर्वी अटक करून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक गणेश उगले (अर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासादरम्यान आणखी काही व्यक्ती गुन्ह्यात सामील असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
दि. 19 नोव्हेंबर रोजी रात्री शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या प्रकरणातील आरोपी जालिंदर बाळसाहेब काळे आणि शरद अंकुश काळे (दोघेही रा. रावताळे कुरुडगाव, ता. शेवगाव) आपल्या राहत्या परिसरात दिसले आहेत. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून तेथे धाड टाकली.
पोलीस पाहताच आरोपी घरातून पळ काढत शेतांकडे धावले. मात्र पोलीस पथकाने तत्परतेने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले व अर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींमुळे किंवा त्यांच्या टोळीमुळे इतर कोणी नागरिक आर्थिक फसवणुकीला बळी पडले असल्यास त्यांनी कोणतीही भीती न बाळगता अर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू व पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोसई अदिनाथ कोठाळे, पोकों शाम गुंजाळ, भगवान सानप, ईश्वर बेरड, राजू बडे, एकनाथ गर्कळ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे कर्मचारी राहुल गुड्डू व नितीन शिंदे यांचा सहभाग होता.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक गणेश उगले हे करीत आहेत.







