
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
राज्यात अनेक जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असताना बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी बिबट्याचे दर्शन नागरीकांना होत असल्याने मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरूर कासार तालुक्यातील काही गावात बिबट्याचे दर्शन नागरीकांना झाले आहे.त्यामूळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यातच तालुक्यातील आर्वी गावातील बाळुमामा मंदिराच्या दक्षिणेकडील भागात बुधवार रोजी सायंकाळच्या सुमारास शेतकरी आपआपल्या शेतातील पिकांना पाणी देत असताना अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना घडली. या दरम्यान एका शेतकऱ्याला अचानक भीतीचा झटका बसून तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. जवळील शेतकरी तात्काळ त्या ठिकाणी धावून गेले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. घरी नेल्यानंतर शेतकऱ्याने संपूर्ण घटना सांगताच परिसरात भीतीचे वातावरण आणखी तीव्र झाले आहे.
शिरूर कासार तालुक्यातील आर्वी परिसरातील नांदेवाली, ढेकवड, पाडळी, ब्रम्हनाथ येळंब, बावी, जांब, तरडगव्हाण भोसले, माळेवाडी, खलापुरी या गावांमध्ये नागरिक हे बिपट्याच्या दहशतीत आहेत. शेतकरीवर्ग रात्रीच्या वेळी शेतात जाण्यासही घाबरत असून नागरिक सतर्क राहण्याचे आवाहन एकमेकांना करत आहेत.
स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्या घटनेनंतर रायगड बाबा डोंगरपट्टीच्या दिशेने गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र तो अद्याप नेमक्या कोणत्या भागात आहे, याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता , भीती वाढली आहे.
स्थानिक ग्रामस्थांचे मत आहे की या परिसरात वन्यजीवांचा वावर वाढत असल्याने वनविभागाने तातडीने पिंजरे लावून उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामुळे बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडून जंगलात सोडणे शक्य होईल आणि नागरिकांचा जीवित धोकाही कमी होईल







