
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
ग्रामीण भागातील वस्ती शाळांमध्ये शिक्षकांची मनमानी आणि शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. परसळे येथील ग्रामपंचायत सदस्य व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक रमजान छबु तडवी यांनी वडरीधरण आसरा भारी वस्ती शाळेतील शिक्षकांविरोधात गंभीर आरोप करीत प्रशासनाला धडक तक्रार सादर केली आहे.
तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वस्ती शाळेत शिक्षक सलग तीन-तीन, चार-चार दिवस गैरहजर राहतात. शाळेत हजर राहण्याची वेळ सकाळी असतानाही संबंधित शिक्षक दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास येतात आणि फक्त तीन ते साडेतीनदरम्यान शाळा बंद करून निघून जातात.
शिक्षकांची ही ‘हजर असूनही गैरहजर’ अशी पद्धत गेल्या चार वर्षांपासून सुरू असल्याचा दावा तडवी यांनी केला आहे.
यातील धक्कादायक मुद्दा असा की
एकही रजेचा अर्ज शाळेत दाखल नसून शिक्षक तोंडी “रजेवर आहे” असे सांगून जबाबदारी टाळतात.
दोन वर्षांपूर्वीही तडवी यांनी तक्रार केली होती, मात्र गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी कोणतीही चौकशी केली नाही.
शिक्षक आठवड्यातून दोन सुट्ट्या स्वतःहून घेणे ही नियमित पद्धत बनली आहे.
तडवी यांनी स्पष्टपणे सांगितले की, “अशा प्रकारच्या निष्काळजी वर्तनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क असताना ग्रामीण वस्ती शाळांकडे प्रशासन पूर्णत: दुर्लक्ष करत आहे. अधिकारी कारवाई न करता शिक्षकांना मुक्तसंचार देत आहेत.”
ते पुढे म्हणाले
“वड्रीधरण शाळेतील परिस्थिती म्हणजे शिक्षण विभागाची विटंबना आहे. शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे. ही माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून कठोर कारवाई व्हावी.”
रमजान छबु तडवी यांनी प्रशासनाचे डोळे उघडावे, शिक्षकांच्या उपस्थितीची चौकशी करून कठोर शिक्षात्मक कारवाई करावी, अशी ठणक मागणी केली आहे.
ग्रामीण भागातील शाळांचा बोजवारा उडाल्यानंतर आता शिक्षण विभाग काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







