
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील केळी बाजारात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मातीमोल दरांवरून सुरू असलेल्या असंतोषाला आता प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठे पाऊल उचलले आहे. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गौतम बलसाणे यांच्या निर्देशानुसार केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
अलीकडेच जिल्हा उपनिबंधक बलसाणे यांच्या अध्यक्षतेखाली यावल येथे व्यापारी, शेतकरी व बाजार समिती यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत केळी दरांमधील तफावत, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक या विषयावर सविस्तर चर्चा झाली होती. याच बैठकीत उपनिबंधकांनी “व्यापाऱ्यांची दप्तर तपासणी करा व दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करा” अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या.
त्याच अनुषंगाने आता यावल बाजार समितीने सर्व केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीसाठी लेखी नोटीसा पाठवल्या असून त्यामध्ये व्यापाऱ्यांना हिशोब पुस्तके, बँक पासबुक, खात्याची स्टेटमेंट व इतर आर्थिक नोंदी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बाजार समितीच्या या हालचालीने व्यापाऱ्यांत मोठी खळबळ उडाली असून तपासणी व कारवाईची भीती व्यापाऱ्यांच्या गळ्याशी आली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत केळी बाजारातील वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीच्या नोटीसा बजावल्या आहेत. दोषी आढळलेल्या व्यापाऱ्यांवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विपणन) अधिनियम 1963 व नियम 1967 अंतर्गत ठोस कारवाई करण्यात येईल. केळीच्या दरातील तफावतीवर निश्चित तोडगा काढण्यासाठी ही कार्यवाही आवश्यक आहे.”
— राकेश फेगडे, सभापती, यावल बाजार समिती







