
जळगाव प्रतिनिधी अमोल खरात
“मॅडम, फोन ठेवा… मला एवढंच काम नाही!” हे वाक्य कुण्या सामान्य नागरिकाला नव्हे तर एका दैनिकाच्या कार्यकारी संपादक प्राजक्ता तायडे यांना जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस व बिबा नगर चोरी प्रकरणी तपासाधिकारी यांनी उद्देशून उच्चारल्याचे समजते. हा प्रसंग पोलिसांच्या निष्क्रियतेचा आणि नागरिकांविषयीच्या त्यांच्या बेफिकीरीचा परमोच्च नमुना ठरला आहे.
१० ऑक्टोबर २०२५ रोजी जळगाव शहरातील बिबा नगर परिसरात तायडे यांच्या घरी सुमारे ₹५ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला. प्रकरणाची नोंद जळगाव तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली. परंतु, एक महिना उलटूनही तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही.
दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी साई गार्डन हॉटेलजवळ काही संशयित व्यक्ती दिसल्याची माहिती मिळाली. या व्यक्तींची वैशिष्ट्ये CCTV फुटेजमधील चोरांशी मिळतीजुळती होती. कार्यकारी संपादक प्राजक्ता तायडे यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ही महत्वाची माहिती दिली. पण, नागरिकांचे ऐकून तत्परतेने कृती करण्याऐवजी पोलिसांनी “फोन ठेवा मॅडम” असे म्हणत तिरस्कारपूर्ण उत्तर दिले.
याच वेळी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाली होती, तेव्हा पोलिसांनी काही तासांत गुन्हा उकलून दाखवला होता. मग सामान्य नागरिक किंवा पत्रकार यांच्याबाबतच पोलिसांचा हा निष्क्रिय आणि अहंकारी वर्तन का?
लोकशाहीत पत्रकार म्हणजे चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी आणि त्यांच्याच सुरक्षिततेकडे पोलिसांनी पाठ फिरवली तर जनतेचा विश्वास कुणावर ठेवायचा?
ही घटना जळगाव तालुका पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेची चौकशी करून संबंधित निरीक्षकावर कारवाई करावी, अशी नागरिक व पत्रकार संघटनांची मागणी आहे.







