
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे नगरपरिषदेकडून उल्लंघन…
अहिल्यानगर/प्रशांत बाफना
शेवगाव शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून नागरिक, शाळकरी मुले तसेच ज्येष्ठ नागरिक या सर्वच वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, शाळांच्या परिसरात तसेच वसाहतींमध्ये भटक्या कुत्र्यांचे थवे दिसत असून रात्रीच्या वेळी बाहेर पडणे अनेकांना धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे शेवगाव नगरपरिषद ही सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे..
गेल्या काही दिवसांत शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या काही घटना घडल्याचे समजते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.
शाळकरी मुले शाळेत ये-जा करताना कुत्र्यांच्या भीतीने घाबरलेली दिसतात. काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व महिला सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळच्या फिरण्यास जाण्यास टाळाटाळ करत आहेत. रस्त्यावरच कुत्र्यांचे साम्राज्य असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.
नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न अधिक तीव्र झाला असल्याची नागरिकांची भावना आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या गजरात शहरातील कुत्र्यांचे नियंत्रण मात्र प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. संबंधित विभागाकडून निर्बंध, बंध्याकरण मोहिम किंवा निवारा केंद्राबाबत कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नाही.
शहरातील नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे आणि निवेदनांद्वारे वारंवार तक्रारी केल्या असून, ‘कुत्र्यांचा उच्छाद थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात’, अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरत आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांना नियंत्रण आणले नाही, तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे.
चौकट
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे शेवगाव नगर परिषदेकडून उल्लंघन…
सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांवर तत्काळ प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तात्काळ कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण करणे गरजेचे आहे.. परंतु असे कुठेही शहरामध्ये होताना दिसत नाही.
चौकट
भटक्या श्वान तसेच जनावरांच्या संदर्भात आपण तीन वेळा नगरपरिषदेकडून टेंडर केले होते. परंतु ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे यावर उपाययोजना होऊ शकल्या नाहीत, तसेच यावर काम चालू आहे अशी त्यांनी म्हटले, परंतु याबाबत त्यांना वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागितले का ? यावर विचारले असता ? त्यांनी मुख्याधिकारी मॅडम यांना विचारा असे सांगितले.







