
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
यावल नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला असून निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. या संदर्भात यावल तहसीलदार तथा यावल नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी मोहनमाला नाझिरकर यांनी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम व प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेप्रमाणे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची सोय उपलब्ध राहणार आहे. तर नामनिर्देशन पत्र जमा करण्याचा कालावधी सकाळी 11 ते दुपारी 3 असा असेल. सुट्टीचे दिवस वगळता अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध राहील.
नामनिर्देशन पत्रांची यादी 18 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
नामनिर्देशन मागे घेण्याचा कालावधी अपील नसल्यास 19 ते 21 नोव्हेंबर, तर अपील असल्यास 21 ते 25 नोव्हेंबर असेल.
निवडणूक चिन्हांचे वाटप 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत होईल.
मतदान 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी 3 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
प्रशासनाची तयारी पूर्ण
निवडणूक निर्णय अधिकारी नाझिरकर यांनी सांगितले की, निवडणूक पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी एफएससी व एसएसटी टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत.
नागरिक व उमेदवारांना एकाच ठिकाणी सर्व कागदपत्रे, परवानग्या व प्रमाणपत्रे मिळावीत यासाठी ‘वन विंडो योजना’ कार्यान्वित करण्यात आली आहे.
नामनिर्देशनासाठी स्वतंत्र कक्ष तयार
सर्व कागदपत्रांसाठी यावल पोलीस स्टेशनमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय राखीव, राज्य राखीव व मुक्त निवडणूक चिन्हांची माहितीपत्रके नगरपरिषद आवारात उपलब्ध
नागरिकांना मार्गदर्शनासाठी सूचना फलक व बॅनर्स लावले आहेत.
निवडणुकीत सहभागी होणाऱ्या कर्मचार्यांचे पहिले प्रशिक्षण 16 नोव्हेंबर रोजी तर दुसरे प्रशिक्षण 24 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
शांतता व सुव्यवस्था राखावी – तहसीलदारांचे आवाहन
“यावल नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि पारदर्शकपणे व्हावी ही सर्वांची जबाबदारी आहे. नागरिक, राजकीय पक्ष, कार्यकर्ते व उमेदवार यांनी सहकार्य करावे.”
– मोहनमाला नाझिरकर, तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी
यावल शहरात निवडणुकीची रंगत वाढली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
पक्षीय रणनीती, उमेदवारांची नावे व मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न आता जोर धरत आहेत.
यावलचा राजकीय तापमान आता स्पष्टपणे वाढताना दिसत आहे.







