
अहिल्यानगर/प्रशांत बाफना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा अरोप केल्यानंतर राज्यभरातला मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून धनंजय मुंडे यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे मुंडे समर्थकांकडून प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून राज्यातले वातावरण ढवळले आहे. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत संशयित आरोपीमधील आपसातली ऑडिओ क्लिपसह धनंजय मुंडे यांच्यातील मोजक्या संवादाची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा करत ती ऐकवली.
घातपात घडवून आणण्यापूर्वी हा डाव उधळून लावल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषदेद्वारे जरांगे पाटील यांचे आरोप फेटाळून लावत प्रकरणाच्या थेट सीआयडी चौकशीसह ब्रेन मॅपिंग, नार्कोटेस्ट ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.
जरांगे पाटील यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांचे दावे मोडित काढत ऑडिओ क्लिप ऐकवत धनंजय मुंडे यांचे नार्कोटेस्ट, ब्रेन मॅपिंगच्या दाव्याला आव्हान देत स्वत:च ब्रेन मॅपिंग, नार्कोटेस्टची मागणी केली. त्यानुसार काल मनोज जरांगे यांचे सहकारी पांडूरंग तारक यांच्यासह मराठा सेवकांनी जालन्याचे पोलिस अधिक्षक यांच्याकडे मनोज जरांगे पाटील यांचा नार्कोटेस्ट मागणीचा आर्ज सादर केला.
जरांगे पाटील यांनी त्यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांच्याही हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा केला. यावर धनंजय मुंडे यांनी काळकुटे आपले चांगले मित्र असल्याचे सांगत काळकुटे माझी आठ आठ तास वाट पाहत बसले. त्यांची माझी मैत्रीचे संबंध असल्याचा दावाही धनंजय मुंडे यांनी केला होता.
धनंजय मुंडे यांच्या दाव्याला काळकुटे यांनी पत्रकार परिषदेद्वारे प्रत्यूत्तर दिले. “ माझे आणि धनंजय मुंडे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते पण, त्यांच्या आका (वाल्मिक कराड) याने संतोष आण्णा देशमुख यांची क्रूर हत्या केल्या नंतर आमची मैत्री तिथेच संपली.
लोकसभेला उमेदवारी ठेवण्यासाठी मला पंचवीस कोटींसह विधान परिषदेवर घेण्याची ऑफर धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आली होती. मात्र, मी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत समाजाचा सेवक म्हणून राहिलो. मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही काळकुटे यांनी खुलासा केला.
दरम्यान, या आरोप प्रत्यारोपांनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले असतानाच राज्यभरातील मराठा समाज धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापुर, लातूर, नांदेड, परभणी, जालन्यासह राज्यातील इतर जिल्ह्यात मराठा समाजाकडून धनंजय मुंडे यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: नार्कोटेस्टची मागणी केल्याने समाज आक्रम झाल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी समाजास शांततेचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडे यांची बदनामी थांबवा म्हणत रस्त्यावर उतरुन धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घातल्या जात आहे.







