
नागरिकांचा संताप, कारवाईची जोरदार मागणी
उपसंपादक:- मिलिंद जंजाळे
यावल पंचायत समितीतील प्रशासन अधिकारी, सह प्रशासन अधिकारी तसेच अनेक कर्मचारी वेळेच्या आधीच कार्यालयातून पसार होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सरकारी कार्यालयातील ही निष्काळजीपणा आणि गैरहजेरी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून, शासनाच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांची अक्षरशः गैरसोय केली जात आहे.
दररोज ठरलेल्या कामकाजाच्या वेळेपेक्षा खूप आधी अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालय सोडून जातात. त्यामुळे कार्यालयात नागरिक कामानिमित्त आले असता त्यांना “साहेब गेले”, “उद्या या” अशा उत्तरांनी परत पाठवले जाते. काही कर्मचाऱ्यांची तर सवयच झाली असून, यावर कोणीही नियंत्रण ठेवत नसल्याने शिस्तभंगाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शासनाने स्पष्टपणे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.15 अशी वेळ निश्चित केली असताना, यावल पंचायत समितीत ही वेळ फक्त कागदावरच दिसते. प्रत्यक्षात मात्र अधिकारी व कर्मचारी “हवे तसे” येतात आणि “हवे तसे” निघून जातात — हे प्रशासनाकडे दुर्लक्षित राहणे म्हणजे जनतेचा अपमानच म्हणावा लागेल.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांचा संयम सुटू शकतो आणि आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या गंभीर शिस्तभंगाच्या पार्श्वभूमीवर दिनांक:-6 ऑक्टोबर रोजी 6:30 वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित होते फक्त सहाय्यक गटविकास अधिकारी बा. का. पवार, कनिष्ठ सहाय्यक (जन्म-मृत्यू विभाग) पवन भोई, पेन्शन विभागातील एक कर्मचारी, शिक्षण विभागातील एक कर्मचारी आणि शिपाई मनोज बजाज. बाकी सर्व अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते.







