
प्रा. डॉ. दयाघन राणे यांचे मार्गदर्शन तरुणांनी व्यसनाला ठाम नकार द्यावा
यावल तालुका प्रतिनिधी ( राहुल जयकर )
घ. का. विद्यालय, आमोदे येथे दिनांक ४ ऑक्टोबर रोजी व्यसनमुक्ती उद्बोधन व चित्रप्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. विद्यालयाच्या तंबाखूमुक्त शाळा समिती तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह (२ ते ९ ऑक्टोबर) निमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य चे नाशिक विभागीय संघटक प्रमुख प्रा. डॉ. दयाघन एस. राणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय बोठे यांनी भूषविले.
प्रा. डॉ. राणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करत सांगितले की, आजचा समाज व्यसनाधीनतेकडे झुकत असून त्यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. भारतात दरवर्षी तब्बल १५ लाख लोक तंबाखूच्या दुष्परिणामांमुळे मृत्युमुखी पडतात.” त्यांनी पुढे सांगितले की, “गुटखा, दारू, सिगारेट आणि तंबाखू यांसारख्या अमली पदार्थांपासून दूर राहणे गरजेचे आहे. मित्रांच्या आग्रहाला ठाम नकार देणे हेच खरे धैर्य आहे.”
मोबाईलच्या व्यसनाविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. “लहान मुलांमध्ये मोबाईल वापराचे प्रमाण चिंताजनक आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधनानुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका ४०० टक्क्यांनी वाढल्याचे आढळले आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर अभ्यासापुरता मर्यादित ठेवावा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. संजय बोठे यांनी विद्यार्थ्यांना जीवनशैलीत सकारात्मक बदल घडविण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध छंद जोपासावेत, मैदानी खेळ खेळावेत आणि आपल्या संस्कृतीनुसार शिस्तबद्ध जीवन जगावे. त्यामुळे व्यसनांपासून आपोआपच दूर राहता येते.”
त्यांनी पुढे सांगितले की, विद्यालय तंबाखूमुक्त शाळा म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य सदैव दिले जाईल.
कार्यक्रमानंतर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे उपलब्ध करून दिलेल्या व्यसनमुक्ती जनजागृती पोस्टर्स चे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. शिक्षकांनी पोस्टर्समधील संदेश समजावून देत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करण्यास प्रेरित केले.
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. गजानन सेवलकर, शाळेतील शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. व्ही. एस. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. पी. एस. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







