
प्रतिनिधी : राहुल जयकर
रावेर तालुक्यातील दसनूर, सिगनूर, आंदलवाडी, बलवाडी व आसपासच्या परिसरात सुकी नदीपात्रे अक्षरशः लुटली जात असून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू, माती व रेतीची वाहतूक भरदिवसा सुरू आहे. विशेष म्हणजे ही वाहतूक इतक्या बिनधास्तपणे चालू आहे की जणू वाळू माफियांनी थेट शासन आणि प्रशासनालाच खुले आव्हान दिले आहे!
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांकडे कोणतेही वैध परवाने नाहीत, रॉयल्टी नाही, वाहतूक पास नाही तरीही जेसीबी व ट्रॅक्टरच्या माध्यमातून नदीपात्रातून वाळू उपसून सर्रास चोरी सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे दसनूर तलाठी कार्यालयासमोरूनच ही अवैध वाहतूक सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. कार्यालयाच्या नाकावर टिच्चून चालणाऱ्या या वाळू चोरीमुळे एकच प्रश्न उपस्थित होत आहे.
महसूल यंत्रणा झोपेत आहे की संगनमताने हे प्रकार चालू आहेत?
या प्रकाराकडे तलाठी समीर तडवी आणि मंडल अधिकारी वानखडे यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाच्या डोळ्यासमोर हा प्रकार घडत असताना कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नदीपात्रातून बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून भूजल पातळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
आता स्थानिक नागरिक थेट प्रश्न विचारत आहेत की,
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर, जेसीबी महसूल विभाग कधी जप्त करणार? दोषींवर गुन्हे दाखल कधी होणार?
की हे प्रकार असाच सुरू राहणार?
रावेर तालुक्यात वाळू चोरीचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला असून, प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई न केल्यास नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.







