
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
यावल तालुक्यातील बोरखेडा खुर्द गावाजवळ शाळेसमोर नुकताच बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या पुलाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पुलाचे काम अवघ्या एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाले असताना इतक्या कमी कालावधीत पुलावर खड्डे पडणे हे निकृष्ट दर्जाच्या कामाकडे बोट दाखवत आहे.
पुलाच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळेच्या समोरच पूल असल्याने लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या कामावर बांधकाम विभागाकडून योग्य प्रकारे देखरेख झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. कामाला एक महिना होत नाही तोच पुलाची अशी अवस्था झाल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या पुलाचे काम बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विपुल चौधरी यांच्या देखरेखीखाली झाल्याची माहिती असून नागरिकांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, पुलाची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच संबंधित ठेकेदारावर बांधकाम विभाग कायदेशीर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.







