
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका जिद्दी व्यक्तीने शिक्षण, मेहनत आणि प्रामाणिक सेवाभावाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली—हे नाव म्हणजे श्री. विश्वनाथ चावदस धनके. आपल्या तब्बल तीन दशकांच्या सेवाकाळात त्यांनी शिक्षक ते प्रभारी गटशिक्षणाधिकारी असा उल्लेखनीय प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला.
दि. ०१ मे १९६८ रोजी मुंजलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथे जन्मलेल्या श्री. धनके यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. दररोज सुमारे ६ किलोमीटर पायी प्रवास करून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे बी.कॉम (६८%) व एम.कॉम पर्यंत उच्च शिक्षण घेत त्यांनी स्वतःला सक्षम बनवले.
सवेला सुरुवात ते प्रशासनातील उंच भरारी
दि. ०६ ऑगस्ट १९९३ रोजी साजगाव (ता. पाचोरा) येथे अनट्रेंड उपशिक्षक म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली. आपल्या प्रामाणिक कार्यशैलीमुळे त्यांनी पुढे केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी अशी जबाबदारी सांभाळली.
२०१२ मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून जामनेर तालुक्यातील पहूर बीटमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच बोदवड येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी व शा.पो.आ. अधीक्षक पदाचा कार्यभारही समर्थपणे पार पाडला.
संघर्षाच्या वादळातही ठाम उभे
२०२१ मध्ये काही प्रशासकीय कारणांमुळे त्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले. मात्र, ०८ एप्रिल २०२१ रोजी निलंबन रद्द होताच त्यांनी पुन्हा नव्या जोमाने सेवेत रुजू होत आपल्या कर्तव्यनिष्ठेची प्रचिती दिली.
यावलमध्ये ठसा उमटवणारे कार्य
दि. १४ फेब्रुवारी २०२३ पासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून यावल येथे कार्यरत राहून त्यांनी तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. शिक्षक, अधिकारी व नागरिकांमध्ये त्यांनी विश्वासार्ह आणि आदरणीय स्थान निर्माण केले.
कुटूबाची भक्कम साथ
त्यांच्या यशामागे त्यांच्या पत्नी सौ. आशा धनके यांचे मोठे योगदान आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी विविध लघुउद्योग करून कुटुंबाचा आर्थिक भार उचलला. त्यांच्या तीनही अपत्यांनीही उच्च शिक्षण घेतले असून—
कन्या डॉ. वैशाली (एम.डी. पॅथॉलॉजी) पुण्यात कार्यरत
जावई डॉ. गणेश पाटोळे (रेडिओलॉजिस्ट)
पुत्र महेश धनके (केमिस्ट्री क्षेत्रात कार्यरत)
पुत्र डॉ. विवेक धनके (MBBS – नानजिंग युनिव्हर्सिटी, चीन) सेवानिवृत्ती—पण कार्याची छाप कायम
दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले. मात्र, त्यांच्या कार्याची छाप यावल तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात कायम राहणार आहे.
“छत्र आम्ही यशवंत, घडवू राष्ट्र उदात्त…” या विचाराला कृतीत उतरवणारे श्री. विश्वनाथ धनके हे आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या जीवनप्रवासातून संघर्ष, जिद्द आणि प्रामाणिकपणाचा खरा अर्थ समजतो.







