
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
साकळी : रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी येथे सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. सर्व समाज बांधवांनी एकत्र येत मुस्लिम बांधवांना गळाभेट देत मनापासून शुभेच्छा दिल्या आणि “एकता हीच खरी ताकद” असल्याचा ठाम संदेश दिला.
साकळी गावात आयोजित शुभेच्छा कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत समाजात सलोखा आणि सौहार्द टिकवण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे,उपस्थितांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्याने कार्यक्रमात भावनिक आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.यावेळी प्रगतशील शेतकरी जितेंद्र वसंतराव महाजन, माजी उपसरपंच किरण मधुकर महाजन, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शाम वसंतराव महाजन,सामाजिक कार्यकर्ता भरात चौधरी, केळी व्यापारी सचिन चौधरी, वढोदा येथील सरपंच संदीप भैया सोनवणे, नावरे येथील माजी सरपंच समाधान पाटील, सामाजिक कार्यकर्ते नासीर खान नजीर खान, पत्रकार मिलिंद जंजाळे, जयंत बोरसे, दुर्गादास महाजन यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“गळाभेटीतून व्यक्त झाला बंधुभाव”यावेळी सर्व समाज बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट देत शुभेच्छा दिल्या. या कृतीतून धर्म, जात, पंथ यांच्यातील भेद विसरून एकमेकांप्रती असलेले प्रेम आणि आदर स्पष्टपणे दिसून आला.
“साकळीने दिला एकतेचा ठोस संदेश”आजच्या तणावपूर्ण वातावरणात साकळी गावाने एकतेचा आणि सौहार्दाचा आदर्श निर्माण केला आहे. काही ठिकाणी समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होत असताना, साकळीकरांनी एकजुटीने त्याला उत्तर देत समाजाला दिशा देणारा संदेश दिला आहे.
“सण एकतेसाठीच!”
रमजान ईद हा सण प्रेम, त्याग आणि बंधुभाव शिकवणारा आहे. साकळीतील या उपक्रमामुळे “सर्व धर्म समभाव” या विचाराला बळ मिळाले असून, इतर गावांसाठीही हा एक आदर्श ठरला आहे.







