
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळावी यासाठी एमबीबीएस (MBBS) डॉक्टरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रे व सरकारी दवाखान्यांमध्ये मनापासून सेवा बजावणे अत्यंत गरजेचे असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. आजही अनेक गावांमध्ये डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांना उपचारासाठी दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागते, ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे.
अनेक एमबीबीएस डॉक्टरांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या शहरांत खाजगी दवाखाने सुरू करण्याकडे कल वाढला आहे. मात्र, ज्या ग्रामीण भागातून आपण घडून आलो, त्या मातीतल्या नागरिकांना योग्य आरोग्यसेवा देणे हीच खरी समाजसेवा असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रत्येक डॉक्टराने जर मनाशी ठरवले की “आपल्या गावातील व परिसरातील नागरिकांना योग्य उपचार देणे ही आपली जबाबदारी आहे”, तर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल घडू शकतो.
ग्रामीण भागातील गरीब व सामान्य नागरिकांकडे महागड्या खाजगी रुग्णालयांचा खर्च पेलण्याची क्षमता नसते. त्यामुळे सरकारी दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे हीच त्यांच्यासाठी जीवनदायी ठरतात. अशा वेळी एमबीबीएस डॉक्टरांनी सरकारी सेवेत राहून निष्ठेने काम केले तर हजारो कुटुंबांना दिलासा मिळू शकतो.
तज्ञांचे मत आहे की, डॉक्टरांनी फक्त आर्थिक फायद्याचा विचार न करता जनतेची सेवा हीच सर्वोच्च जबाबदारी मानली, तर समाजात डॉक्टरांविषयी असलेला सन्मान आणि विश्वास अधिक दृढ होईल. ग्रामीण भागातील नागरिक देखील अशा सेवाभावी डॉक्टरांकडे मोठ्या अभिमानाने पाहतील.
आज गरज आहे ती ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला सक्षम बनविण्यासाठी तरुण डॉक्टरांनी पुढाकार घेण्याची. डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला, तरच त्यांच्या शिक्षणाचे आणि जन्माचे खरे सार्थक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







